Hingoli Kabaddi Tournament: हिंगोलीत डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत अनेक स्थानिक संघांनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते झाले.
हिंगोली (Hingoli Kabaddi Tournament) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून हिंगोली जिल्हा हौशी सायकलिंग असोसिएशन व बहुजन क्रिडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर मुलींच्या भव्य दिव्य दणदणीत कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रविवार, १९ एप्रिल रोजी सकाळी १० वा. आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम, शिवाजी इंगोले सर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. बंकटलाल यादव, दत्तराव बांगर, गजानन आडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक क्रीडा शिक्षक, पदाधिकारी व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Hingoli Kabaddi Tournament) हिंगोली जिल्हा मर्यादित ५५ किलो आतील वजनी गटासाठी आयोजित या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध शाळा व क्रीडा मंडळांच्या मुलींच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. सकाळच्या सत्रापासूनच मैदानावर खेळाडूंचा उत्साह व चुरशीचे सामने पहायला मिळाले. स्पर्धेसाठी आयोजकांनी विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर केली आहेत.
- प्रथम बक्षीस: ११,१३५/- रुपये - मा. नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यातर्फे
- द्वितीय बक्षीस: ७,१३५/- रुपये - जगजितजी खुराणा यांच्यातर्फे
- तृतीय बक्षीस: ५,१३५/- रुपये - अनिल नेनवाणी यांच्यातर्फे
- चौथे बक्षीस: ३,१३५/- रुपये - प्रा. बंकट नंदलाल यादव यांच्यातर्फे
- पाचवे बक्षीस: २,१३५/- रुपये - मिलिंद कवाणे यांच्यातर्फे
- सहावे बक्षीस: १,१३५/- रुपये - प्रकाश नारायण हलगे यांच्यातर्फे
याशिवाय ७ ते १६ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी १०००/- रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले, "डॉ. बाबासाहेबांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' हा मंत्र मुलींनी क्रीडा क्षेत्रातही आत्मसात करावा. अशा स्पर्धांमधून ग्रामीण भागातील मुलींना हक्काचे व्यासपीठ मिळते असे सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजी इंगोले , रामदास हनुमंते , गजानन आडे व इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. दिवसभर रंगणाऱ्या या सामन्यांसाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.