हिंगोली जिल्ह्यात 11 जून 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला.
हिंगोली (Hingoli Earthquake) : हिंगोली जिल्ह्यात 11 जून 2026 रोजी सकाळी 8.45 वाजता 4.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव असल्याचे बोलले जात आहे. या भूकंपामुळे गावातील कच्च्या मातीची काही घरे कोसळली, तर अनेक पक्क्या घरांना मोठे तडे गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते यांनी पांगरा शिंदे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या व धीर दिला. “येणाऱ्या काळात पांगरा शिंदे गावात भूकंपरोधक विकास कामे केली जातील. नागरिकांनी घाबरू नये, प्रशासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासन खा. वडकुते यांनी यावेळी दिले.

या प्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. उज्वलाताई तांभाळे, तालुकाध्यक्ष डॉ. अवधुतराव शिंदे, संजय काकडे यांच्यासह समस्त गावकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी खासदार रामराव वडकुते यांच्याकडे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी केली.
भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात असून, लवकरच मदतकार्य सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गावात सध्या भीतीचे वातावरण असून नागरिक उघड्यावर जीव मुठीत धरून राहत आहेत.