Hingoli Diesel Shortage: हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या कामांमध्ये शेतकऱ्यांना डिझेल टंचाईची गंभीर समस्या दिसून येत आहे.
शेतीची कामे मंदावली, शेतकऱ्यांना दिवस-रात्र डिझेलची प्रतीक्षाच
हिंगोली (Hingoli Diesel Shortage) : खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना खरीप हंगाम पूर्व मशागती कामांच्या तयारीत व्यस्त असतानाच हिंगोली जिल्ह्यात डिझेलटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा पुरवठा अपुरा पडत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-रात्र डिझेलची प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर मागील काही दिवसांपासून डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. शेतीची बहुतांश कामे ट्रॅक्टर, तसेच यंत्राच्या सहाय्याने होत असल्याने त्याकरिता डिझेलची मोठी आवश्यकता असते.
युद्धजन्य परिस्थितीमुळे पंपावर डिझेल, पेट्रोलचा मोठा तुटवडा (Hingoli Diesel Shortage) पहायला मिळत असल्याने डिझेलसाठी रात्रंदिवस खडा पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पहाटेपासूनच अनेक शेतकरी ड्रम, कॅन घेऊन पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याचे चित्र
दिसून येत आहे. अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही असे फलक लावण्यात आल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होत आहे.
काही पंपांवर मर्यादित डिझेल उपलब्ध असल्याने वाहनधारक आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत आहेत. वेळेवर मशागत झाली नाही, तर पेरणी उशिरा होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे खरीप हंगाम लक्षात घेता जिल्ह्य प्रशासनाने (Hingoli Diesel Shortage) डिझेल, पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.
हवामान विभागाने यंदा पावसाचा अंदाज समाधानकारक असल्याचे भाकित केले आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपासाठी मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत. मात्र, डिझेल टंचाईमुळे शेतीच्या सुरुवातीच्या कामांनाच अडथळे निर्माण होत आहेत. ट्रॅक्टर चालकांनाही डिझेल अभावी कामे थांबवावी लागत असल्याने शेतीच्या कामाचा वेग मंदावला आहे.