Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली कोंबिंग ऑपरेशन

जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन थंडावल्याने गुन्हेगारांनी काढले वर तोंड

Hingoli Combing Operation: प्रमुख कारण म्हणजे पोलिसांकडून घेतले जाणारे कोंबिंग ऑपरेशन जवळपास थांबल्याने गुन्हेगार बिनधास्त झाल्याची चर्चा आता सर्वत्र आहे.


जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन थंडावल्याने गुन्हेगारांनी काढले वर तोंड

Hingoli Combing Operation |

 

पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता

हिंगोली (Hingoli Combing Operation) : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पोलिसांकडून घेतले जाणारे कोंबिंग ऑपरेशन जवळपास थांबल्याने गुन्हेगार बिनधास्त झाल्याची चर्चा आता सर्वत्र आहे.

काही महिन्यांपूर्वी हिंगोली, वसमत, कळमनुरी आणि सेनगाव परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांकडून नियमित कोंबिंग ऑपरेशन राबवली जात होती. संशयितांची तपासणी, नाकाबंदी आणि रात्री गस्त यामुळे चोरी, वाहनचोरी आणि दरोड्यांच्या घटना नियंत्रणात होत्या. मात्र सध्या ही मोहीम जवळपास बंद झाली असून त्याचा थेट परिणाम कायदा-सुव्यवस्थेवर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुचाकी चोरी,  घरफोड्या,  गावगुंडांच्या मारहाणीच्या घटना आणि शहरात दिवसाढवळ्या चोरीचे प्रकार घडले आहेत. 

वसमत तालुक्यात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. कळमनुरी तालुक्यात शेतातून मोटर, केबल चोरीच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिक तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेले तरी 'तपास सुरू आहे' या एकाच उत्तरावर बोळवण होते आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, कोंबिंग ऑपरेशन बंद झाल्याने बाहेरच्या जिल्ह्यातून येणार्‍या गुन्हेगारांनाही हिंगोली सुरक्षित वाटू लागली आहे. त्यामुळे तरुणाई आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरी जबरी चोरी अशा अनेक गंभीर घटना घडल्या आहेत.

गुन्हेगारांचा तपास करण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस ठाणे स्तरावरील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वेळी (Hingoli Combing Operation) कोंबिंग ऑपरेशन केले जाते परंतु मागील काही कालावधीपासून कोंबिंग ऑपरेशन झाले नसल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नाही. पोलीस प्रशासनाकडून मात्र मनुष्यबळ कमी असल्याचे आणि इतर बंदोबस्तात व्यस्त असल्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु नागरिकांचा प्रश्न आहे की, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा इतर बंदोबस्त मोठा कसा? गुन्हेगारी आटोक्यात आणायची असेल तर तातडीने कोंबिंग ऑपरेशन पुन्हा सुरू करून संशयितांची यादी तयार करणे, हॉटेल, लॉज आणि रेल्वे परिसरात तपासणी करणे गरजेचे आहे. अन्यथा हिंगोली जिल्ह्याची शांतता कायमची धोक्यात येऊ शकते.  पोलीस अधीक्षकांनी याबत तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

अनेक तडीपार आरोपीकडून कायद्याचे उल्लंघन
 हिंगोली जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी मोडून काढण्याकरता पोलीस प्रशासन व उपविभागीय अधिकारी कार्यालय स्तरावरून अनेक सराईत गुन्हेगारांना तडीपार केले जाते. परंतु त्यातील काही सराईत गुन्हेगार तडीपार आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यातच वावरत असतात. कधीकधी पोलिसांची मोहीम निघाल्यानंतर काहींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. परंतु या गुन्ह्यांना न डगमगता तडीपार केलेले सराईत गुन्हेगार अधून मधून जिल्ह्यात वावर करीतच असतात.

यापूर्वी आठवड्यातून शनिवारी व्हायचे कोंबिंग ऑपरेशन
विशेष म्हणजे यापूर्वी प्रत्येक शनिवारी (Hingoli Combing Operation) कोंबिंग ऑपरेशन केले जात होते. जिल्ह्यात गुन्हेगारी असलेल्या वस्तीमध्ये कोंबिंग ऑपरेशन घेण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेची असते. परंतु सध्या या पथकाचे भलतीकडेच लक्ष असल्याने कोंबिंग ऑपरेशन थंडावली आहे परिणामी गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे. भविष्यात अनेक मोठे सण व उत्सव आहेत अशावेळी वाढलेली गुन्हेगारी ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.