Hingoli Bus Station: हिंगोली बस स्थानकात ऑटोचालकांच्या मनमानीमुळे बसचालक व वाहकांना अडचणी उद्भवल्या आहेत. नियम धाब्यावर बसवत असलेल्या ऑटोचालकांविरुद्ध कारवाईची मागणी उठली आहे.
हिंगोली (Hingoli Bus Station) : हिंगोली शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात ऑटोचालकांच्या मनमानी कारभारामुळे बसचालक व वाहक अक्षरशः हैराण झाले आहेत. बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांना घेण्यासाठी ऑटोचालक थेट बसच्या दारापर्यंत ऑटो आणत असल्याने दररोज गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंगोली आगारात एखादी बस फलाटावर येताच ,3- 4 ऑटो चालक वेगाने बसच्या मागे-पुढे ऑटो लावतात. प्रवासी उतरताच त्यांच्या सामानासाठी ओढाताण केली जाते. यामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो. अनेकदा बस व ऑटोचालकांमध्ये शाब्दिक चकमकीही होतात.
बसस्थानक (Hingoli Bus Statio)n हे एसटी महामंडळाच्या अखत्यारीतील क्षेत्र आहे. येथे खाजगी वाहनांना प्रवेशबंदी असतानाही ऑटोचालक सर्रास नियम धाब्यावर बसवत आहेत. अरुंद फलाटावर बस, प्रवासी आणि ऑटोंची गर्दी होत असल्याने कधीही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या आठवड्यात एका ज्येष्ठ नागरिकाला ऑटोची धडक बसता-बसता वाचली होती.
बस फलाटावर लावायच्या आधीच ऑटोवाले घेराव घालतात. हॉर्न वाजवला तरी बाजूला होत नाहीत. वेळेवर बस काढता येत नाही. वरिष्ठांना सांगूनही कारवाई होत नाही,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका वाहकाने सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने चालकांमध्येही नाराजी आहे. या (Hingoli Bus Station) प्रकाराकडे आगार प्रशासन व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. बसस्थानकात सुरक्षा रक्षक असूनही ऑटोचालकांवर नियंत्रण नाही. फलाट क्रमांक 1 व 2 वर तर कायमच ऑटोंचा वेढा असतो.
बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग झोन’चे फलक लावावेत, ऑटोसाठी स्वतंत्र थांबा निश्चित करावा व नियम मोडणाऱ्या ऑटोचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. आगार प्रमुखांनी तातडीने बैठक घेऊन वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा प्रश्न सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बसचालक-वाहक संघटनेने दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा बसस्थानकातील ही दादागिरी एखाद्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते.