Hingoli helmet compulsory: हिंगोली जिल्ह्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. अपघातांमध्ये वाढ झाल्याने ही नवीन उपाययोजना केली गेली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांचा इशारा
हिंगोली (Hingoli helmet compulsory) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आजपासून दुचाकीस्वारांसह पाठीमागे बसणार्यांनाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित वाहतूक जनजागृती व प्रथमोपचार माहिती कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांत हिंगोली जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू दुचाकीस्वारांचे झाले आहेत, असे डॉ. रोहन यांनी प्रास्ताविकात सांगितले. मानवी व वित्तहानी रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार २० एप्रिल २०२६ पासून हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. चारचाकी वाहन चालकांसाठी सीट बेल्ट, दारू पिऊन वाहन न चालवणे, मोबाईलचा वापर टाळणे, ट्रिपल सीट टाळणे आदी सूचनाही देण्यात आल्या. (Hingoli helmet compulsory) अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी नागरिकांनी ११२ व १०८ या निःशुल्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. मदत करणार्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली जाईल व त्यांना कोर्टाची फेरी करावी लागणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. पीएम राहत योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयात जखमींवर दीड लाखांपर्यंत मोफत उपचार होतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

परिवहन विभागाने विद्यार्थ्यांनी विनापरवाना वाहन न चालवण्याचे व पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने न देण्याचे आवाहन केले. वैद्यकीय पथकाने प्रथमोपचार व सीपीआरचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, संदीप मोदे, जमीर नाईक, शरद मरे, परिवहन अधिकारी चंद्रकीर्ती टिपले, विक्रांत भोईने यांच्यासह डॉक्टर पथक, ठाणेदार, पोलीस पाटील, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सपोनि शिवसांब घेवारे यांनी केले. दरम्यान, वाहनचालकांनी वेळोवेळी वैद्यकीय तपासणी व वाहन फिटनेस तपासून घ्यावा, असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.