एकीकडे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी उष्णतेच्या झळा सहन करत वर्गात बसण्याची वेळ आली आहे.
पत्र्यांच्या शाळांमध्ये उकाड्याचा कहर; पिण्याच्या पाण्याची टंचाई, सकाळच्या सत्राची पालकांकडून जोरदार मागणी
उदगीर (Heatwave) : एकीकडे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी उष्णतेच्या झळा सहन करत वर्गात बसण्याची वेळ आली आहे. जून महिना अखेरच्या टप्प्यात पोहोचला तरी पावसाने पाठ फिरवली असून उदगीर तालुक्यातील अनेक शाळा अक्षरशः ‘तप्त भट्ट्या’ बनल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगाची अक्षरशः लाही-लाही होत असून पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
१५ जूनपासून शाळा सुरू झाल्या; मात्र विद्यार्थ्यांचे स्वागत पावसाच्या सरींनी नव्हे, तर अंग भाजून काढणाऱ्या उन्हानेच झाले. सकाळपासूनच तापणारे वातावरण, दुपारी असह्य उकाडा आणि पत्र्यांच्या छताखाली भरविण्यात येणारे वर्ग यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक शाळांमध्ये पंखे असूनही त्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे, तर काही शाळांमध्ये पंख्यांची सुविधाच नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याची चर्चा असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. काही गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून त्याचा परिणाम शाळांवरही झाला आहे. विद्यार्थ्यांना तहान भागविण्यासाठी पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या इमारती जुन्या व अपुऱ्या आहेत. पत्र्यांच्या वर्गखोल्यांमध्ये तापमान इतके वाढते की विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा आदी तक्रारीही वाढल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने वेळेत निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाची वाट, विद्यार्थ्यांवर आघात!
पेरणी खोळंबली, विहिरी कोरड्या पडल्या, पाण्याची टंचाई वाढली आणि आता त्याची झळ थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. जून महिन्यातही एप्रिल-मेप्रमाणेच तीव्र उष्णता कायम असल्याने ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
‘उकाड्याच्या वर्गात शिक्षण की विद्यार्थ्यांची परीक्षा?’
उन्हाळ्यापेक्षाही अधिक तीव्र उष्णतेचा चटका बसत असल्याने ग्रामीण भागातील अनेक शाळा तप्त भट्ट्यांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर कमतरता, पत्र्यांच्या वर्गखोल्यांतील असह्य उकाडा आणि विद्यार्थ्यांवर वाढलेला उष्माघाताचा धोका लक्षात घेता शाळा तातडीने सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.