आयुक्त डॉ. इटनकर यांच्या सूचना
नागपूर (Heatwave Prevention) : महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकारी समितीची बैठक मंगळवारी आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली.
बैठकीत आयुक्त डॉ. इटनकर यांनी शहरामध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची ठिकाणे उपलब्ध करणे तसेच आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., उपायुक्त मंगेश राजेश भगत, खवले, उपायुक्त महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत आयुक्तांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ग्रीन नेट (सावलीसाठी जाळी) लावण्यात यावे व नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी स्मार्ट टॉयलेटच्या शेजारी तात्पुरत्या वॉटर किऑस्कची व्यवस्था करण्याचे सूचवले व रुग्णांना उष्णतेपासून बचाव मिळावा यासाठी शासकीय व महानगपालिका रुग्णालयांमध्ये कोल्ड वॉर्ड तयार करण्याबाबतही निर्देश देण्यात आले. तसेच उष्माघाताशी संबंधित पोस्टमार्टम अहवालथेट पोलिसांसोबत महापालिकेला पाठवावे या बद्दल निर्देशित केले.
कोल्ड शेड उभारा
अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणी 'कोल्ड शेड' उभारावेत, जेणेकरून नागरिकांना उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळेल अशा सूचना केल्या, याशिवाय क्रीडा विभाग, घनकचरा विभाग, अभियंता विभाग व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून, उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना २०२६ प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात आपले मत व सूचना मांडल्या.