Hayat Certificate Online: राज्य शासनाने लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र सादर करण्याची ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. बीएसए ॲपच्या माध्यमातून ही प्रक्रिया सोपी झाली आहे
कळमनुरी (Hayat Certificate Online) : केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी बेनेफिशियल सत्यापन ॲप ही प्रणाली वापरण्यात येणार असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबत ७ मे रोजी परिपत्रक जारी केले आहे. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार आहे.
लाभार्थी स्वतः मोबाईलवरून किंवा नातेवाईकांच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातूनही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Hayat Certificate Online) लाभार्थ्यांसाठी ही सेवा मोफत असली तरी सेतू किंवा सेवा केंद्रांमार्फत सेवा घेतल्यास किमान ५० रुपये सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे.
हयात प्रमाणपत्र (Hayat Certificate Online) सादर करण्यासाठी लाभार्थ्यांनी प्रथम मोबाईलमध्ये गुगल प्लेस्टोअर अथवा आयओएसवरून बीएसए आणि आधार फेस आरडी ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर आधार क्रमांक व मोबाईल नंबरच्या साहाय्याने नोंदणी करून संबंधित योजनेची निवड करावी लागणार आहे. ओटीपी पडताळणीनंतर चेहरा ओळख किंवा बोटांचे ठसे यांच्या माध्यमातून पडताळणी पूर्ण करून डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन तहसीलदार जीवककुमार कांबळे, नायब तहसीलदार बी. बी. धूत, गजानन वाठोरे, वंदना टोकवार व वसीम फारुकी यांनी केले आहे.