Hayat Certificate Online: महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना तहसिलदारांचे आवाहन
चिखली (Hayat Certificate Online) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 7 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना आता Beneficiary Satyapan App द्वारे हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या *Hayat Certificate Online( निर्णयानुसार लाभार्थ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे किंवा नातेवाईकांच्या मदतीने हयात प्रमाणपत्र अद्यावत करावे. तसेच गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्राम महसूल सेवक (कोतवाल), ग्रामपंचायत संगणक परिचालक, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. हयात प्रमाणपत्र काढण्यासाठी लाभार्थ्यांनी मोबाईलवरील गुगल प्लेस्टोअरमधून Beneficiary Satyapan App आणि Aadhar Face RD हे ॲप डाउनलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक नमूद करून नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित योजनेची निवड करून फेस कॅप्चर किंवा बोटांचे ठसे या पर्यायाद्वारे डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करता येणार आहे.
चिखली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी तातडीने हयात प्रमाणपत्र ऑनलाईन अद्यावत करून घ्यावे, असे आवाहन तहसिलदार विजय सवडे यांनी केले आहे. यासंदर्भात (Hayat Certificate Online) काही अडचण किंवा शंका असल्यास संबंधित गावातील तलाठी, कोतवाल अथवा तहसिल कार्यालय, चिखली येथील संगायो शाखेशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार हयात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचे जून महिन्यापासून अनुदान बंद करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी याची गंभीर दखल घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.