Hamal Labor Andolan: कळमनुरी येथील हमाल कामगारांनी जानेवारी ते एप्रिल २०२६ पर्यंतच्या थकीत देयकांची मागणी करून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
कळमनुरी (Hamal Labor Andolan) : येथील शासकीय धान्य गोदाम कळमनुरी येथील हमाल कामगारांची जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीतील हमाली देयके अद्यापही अदा करण्यात आलेली नसल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. थकीत देयके तातडीने मिळावीत या मागणीसाठी हमाल कामगारांनी १४ मेपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, हमाली हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असून मागील चार महिन्यांपासून देयके न मिळाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक कामगार कर्जबाजारी झाले असून घरखर्च भागविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने थकीत रक्कम अदा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
यासंदर्भात हमाल कामगारांनी ७ मे रोजी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. सात दिवसांच्या आत हमाली देयके अदा करावीत, अन्यथा (Hamal Labor Andolan) आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र मागणीची दखल न घेतल्याने अखेर कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
या निवेदनावर शेख असद, शेख अब्दुल, शेख नजीर, शेख शफीक, शेख अनवर, आयुब खान, फिरोज खान, शेख बबलू आदी कामगारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सध्या कळमनुरी येथील हमाल कामगार आंदोलनावर (Hamal Labor Andolan) ठाम असून प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.