जिल्ह्यातील वसमत शहरात अन्न व औषध प्रशासन आणि वसमत शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन आणि वसमत शहर पोलिसांची संयुक्त कारवाई
हिंगोली (Gutkha Seizure) : जिल्ह्यातील वसमत शहरात अन्न व औषध प्रशासन आणि वसमत शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 1 लाख 36 हजार 336 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी तुषार श्रीराम घोपे यांच्या फिर्यादीवरून 29 जून रोजी ही कारवाई करण्यात आली. आरोपी धोंडीबा केदारलिंग तुपेकर आणि युनूस करीम खान हे दोघेही वसमत येथील रहिवासी आहेत. धोंडीबा तुपेकर हा बाबा कन्फेक्शनरीसमोर, तर युनूस खान हा ए.के. कन्फेक्शनरीसमोर प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व सुपारीची वाहतूक आणि विक्री करताना आढळून आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी धोंडीबा तुपेकर याच्याकडून विमल पान मसाला, गोवा 1000 गुटखा, वझीर गुटखा, राजसी परंपरा यांसह एक मोटारसायकल असा 52 हजार 14 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर युनूस खान याच्याकडून आर.के. क्लासिक पान मसाला, व्ही वन तंबाखू, विमल पान मसाला, जाफरानी जर्दा, राजू इलायची सुपारी, BAWA 270, नखराली स्वीट सुपारी आणि आर.के. क्लासिक सुगंधित तंबाखू असा 84 हजार 322 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखाजन्य पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असल्याची माहिती असूनही दोन्ही आरोपी आर्थिक फायद्यासाठी त्यांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 123, 223, 274 आणि 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सपोनि परगेवार करत आहेत.
या कारवाईमुळे वसमत शहरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.