Gram Panchayat Reservation: राज्य निवडणूक आयोगाच्या 26 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार वसमत तालुक्यातील 106 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी कार्यालय
हिंगोली (Gram Panchayat Reservation) : राज्य निवडणूक आयोगाच्या 26 मे 2026 रोजीच्या आदेशानुसार वसमत तालुक्यातील 106 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आला आहे. सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील राज्यातील एकूण 15,636 ग्राम पंचायतींसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत वसमत तालुक्यातील कुंदा, गिरगाव, हट्टा, आडगाव, आंबा, हयातनगर यांच्यासह एकूण 106 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
आरक्षण सोडत विशेष ग्रामसभेमध्ये तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली काढली जाणार आहे. ही सोडत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी होणार आहे. (Gram Panchayat Reservation) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 10 पोटकलम 2 नुसार नागरिकांच्या मागासवर्गासाठी 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण राहील. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मागासवर्ग यांचे एकत्रित आरक्षण पंचायतीमधील एकूण जागांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
जाहीर कार्यक्रमानुसार विशेष ग्रामसभेची सूचना 8 जून 2026 पर्यंत (Gram Panchayat Reservation) ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावणे बंधनकारक आहे. प्रत्यक्ष आरक्षण सोडत 12 जून 2026 रोजी शुक्रवारी काढण्यात येईल. प्रारूप आरक्षण अधिसूचना 19 जून 2026 रोजी प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती व सूचना 19 जून ते 25 जून 2026 या कालावधीत तहसील कार्यालयात सादर करता येतील. हरकतींवर उपविभागीय अधिकारी 3 जुलै 2026 पर्यंत अभिप्राय देतील. अंतिम अधिसूचनेला जिल्हाधिकारी 8 जुलै 2026 रोजी मान्यता देतील आणि 10 जुलै 2026 रोजी अंतिम प्रभाग रचनेची व्यापक प्रसिद्धी केली जाईल.
प्रक्रिया पारदर्शक राहण्यासाठी नागरिकांनी विशेष ग्रामसभेस उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार वसमत यांनी केले आहे. सदर प्रसिद्धीपत्रक जिल्हाधिकारी हिंगोली, उपविभागीय अधिकारी वसमत, सर्व संबंधित ग्रामपंचायत कार्यालये, मंडळ अधिकारी व स्थानिक प्रसार माध्यमांना माहितीसाठी देण्यात आले आहे.