आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे ‘रसायन’ औषध म्हणून ओळखली जाणारी गुळवेल (गिलोय) सध्या हिरव्या गडद आणि लालभडक फळांनी बहरलेली दिसून येत आहे.
लातूर (Giloy Benefits) : आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे ‘रसायन’ औषध म्हणून ओळखली जाणारी गुळवेल (गिलोय) सध्या हिरव्या गडद आणि लालभडक फळांनी बहरलेली दिसून येत आहे. त्यामुळे या वनस्पतीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, जुनाट ताप (डेंग्यू, मलेरिया) कमी करण्यासाठी, रक्तातील साखर (मधुमेह) नियंत्रणात ठेवण्यासाठी, यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच संधिवातातील वेदना कमी करण्यासाठी गुळवेल अत्यंत गुणकारी मानली जाते. सध्या या वेलीवर हिरव्या ते लाल रंगाच्या फळांचा बहर दिसून येत आहे.
उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीचा कालावधी हा गुळवेलीला फळे व बिया येण्याचा काळ असतो. मार्च ते जुलै दरम्यान अनेक ठिकाणी गुळवेल फळांनी लगडलेली आढळते. औसा तालुक्यातील आलमला शिवारातही अशी फळे व बिया लागलेली गुळवेल आढळून आली आहे. वाटाण्याएवढ्या आकाराची ही फळे सुरुवातीला हिरवी असतात, तर पक्व झाल्यानंतर ती लालभडक रंगाची दिसतात.
गुळवेलीची लागवड प्रामुख्याने काड्यांपासून केली जाते. पिकलेल्या लाल फळामध्ये साधारणपणे एकच कठीण कवच असलेले बी असते, ज्यापासूनही रोपे तयार करता येतात.
गुळवेलचे आयुर्वेदातील महत्त्व व उपयोग
- रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी: गुळवेल शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, त्यामुळे वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
- ज्वरनाशक: डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू आणि चिकनगुनिया यांसारख्या विषाणूजन्य तापांवर उपयुक्त मानली जाते.
- मधुमेह नियंत्रण: रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
- पचनसंस्था व यकृतासाठी उपयुक्त: पचन सुधारते, बद्धकोष्ठता दूर करते आणि यकृताचे कार्य सुधारते.
- संधिवात व वेदनाशामक: संधिवात आणि सांधेदुखीतील वेदना व सूज कमी करण्यास मदत करते.
- त्वचा व रक्तशुद्धी: रक्तशुद्धी करून त्वचेचे विकार, मुरुमे कमी करण्यास सहाय्यभूत ठरते.
वापर कसा करावा?
गुळवेलाचा वापर प्रामुख्याने रस, काढा किंवा चूर्ण या स्वरूपात केला जातो. कडुलिंबाच्या झाडावर वाढलेली गुळवेल अधिक गुणकारी मानली जाते. मात्र, याचा वापर तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच करणे उचित ठरते.
कडुलिंबावरची गुळवेल अधिक प्रभावी
कडुलिंबावर वाढलेली गुळवेल सर्वोत्तम मानली जाते, कारण ती कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आत्मसात करते. त्वचारोग आणि रक्तशुद्धीसाठी तिची विशेष मागणी असते. तसेच आंबा, पिंपळ, उंबर, बाभळ आदी झाडांवर वाढलेली गुळवेलही ताप नियंत्रण आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.