जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या घोट परिसराला तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे.
घोट (Ghot Taluka Demand) : जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व भौगोलिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या घोट परिसराला तालुक्याचा दर्जा मिळावा, ही मागणी तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे. 1989 व 1991 मध्ये या मागणीसाठी भव्य मोर्चे काढण्यात आले होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात घोटचा विचार न करता इतर ठिकाणी नवीन तालुका जाहीर करण्यात आल्याने घोट परिसरावर अन्याय झाल्याची भावना नागरिकांमध्ये आजही कायम आहे.
त्यानंतरच्या काळातही घोट तालुक्यासाठी सातत्याने चाळीस वर्षात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी ते देवेंद्र फडणवीस सर्वांना भेटी घेऊन व मोर्चे, आंदोलने,बाजारपेठ बंद, निवेदन सादरीकरण असे विविध मार्गांनी लढा उभारण्यात आला.परंतु चार दशकांनंतरही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची लाट पसरली आहे.
मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत प्रशासनाने न्याय न दिल्यास मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच घोट परिसरातील आदिवासी व दुर्गम भागाचा विचार करून स्वतंत्र तालुका घोषित करावा,अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
घोट तालुक्यासाठी 19 ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून घोट, पेटतळा, सिमुलतला,भाडभिडी बी, हळदवाही, मक्केपल्ली चेक, मक्केपल्ली माल, माडेआमगाव,रेगडी, विकासल्ली,चापलवाडा, वरूर,नेताजीनगर,वसंतपुर, बहादुरपुर,सुभाषग्राम, येडानुर,राममोहनपुर, पावीमुरांडा आदी ग्रामपंचायतीच्या पाठिंबा दर्शविला असून, या ग्रामपंचायत मध्ये अनेक गावे आदिवासी व पेसा क्षेत्रातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घोट तालुक्यासाठी ठराव पारित केले असून प्रशासन महाराष्ट्र शासनानेया ठरावांची दखल घेऊन तातडीने घोट तालुक्याच्या निर्णय घेऊन घोट तालुकाच्या मार्ग सुकर करावा अशी अपेक्षा जनसामान्य नागरिकात केली जात आहे.