जुने बसस्टँड–रामवाडी रोडवरील स्मशानभूमी परिसरात मटन-कचरा टाकल्याने तीव्र दुर्गंधी; नागरिक त्रस्त.
कळमनुरी (Garbage Issue India) : शहरातील जुने बसस्टँड ते रामवाडी रोड या मुख्य मार्गावरील स्मशानभूमी परिसरात मटन, चिकनचे कातडे, विष्ठा व इतर कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे हाल होत आहेत. या प्रकारामुळे विविध समाजांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
हा रस्ता खाजा कॉलनी, रेणुकानगर, पवार कॉलनी, जमजम कॉलनी या भागांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. या परिसरात राजपूत समाज, मातंग समाज, हिंदू समाजाची स्मशानभूमी तसेच मुस्लिम समाजाचे कब्रस्थान असून गुलाम नबी आझाद कॉलेजही आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला व वृद्ध नागरिकांची या मार्गावरून सतत ये-जा सुरू असते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काही चिकन व मटन विक्रेते तसेच हॉटेल चालक त्यांच्या दुकानातील कचरा, कातडे व विष्ठा येथे टाकत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याशिवाय काही सलून चालकही केस व इतर कचरा येथे फेकत असल्याने परिसर अत्यंत अस्वच्छ झाला आहे. कचऱ्यामुळे भटके कुत्रे हे अवशेष स्मशानभूमीत ओढून नेत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
या प्रकारामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून दुर्गंधीमुळे रस्त्याने जाणेही कठीण झाले आहे. याबाबत अनेक वेळा संबंधितांना समज देऊन तसेच नगर परिषदेकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याशिवाय या परिसरात रस्त्यालगत लाईटची सुविधा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय अधिक वाढत आहे.
हा प्रकार तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, परिसराची स्वच्छता करण्यात यावी तसेच रस्त्यावर लाईटची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी नगर परिषदेकडे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी मौलाना करीमोदीन, आवेस पठाण, अखिल सिद्दिकी, हाफिज पठाण, राजू इंगळे, जमील पठाण, अनिल इंगळे, रवी इंगळे, पिंटू सातव, राजा गाभणे, मसूद पठाण, लूकमान सिद्दिकी, फुरखान पठाण, शहेबाज खादरी, प्रकाश सिंह वर्मा, अजय वर्मा, देवेंद्र रेंजरकर, दीपक वर्मा, अनिल सिंह वर्मा, विजय वर्मा, सुमित वर्मा आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.