बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शेलोडी शिवारातील एका शेतावर सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धडक कारवाई करत १२ जणांना ताब्यात घेतले.
मुख्य आरोपी राजू बघे फरार; महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि BNS अंतर्गत १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शेलोडी शिवारातील एका शेतावर सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धडक कारवाई करत १२ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व इतर साहित्यांसह एकूण ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जुगार अड्डा चालवणारा मुख्य आरोपी राजू बघे हा घटनास्थळावरून पसार झाला आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पिंप्री गवळी येथील रहिवासी राजू बघे हा शिवसेना शिंदे गटाचा तालुकाप्रमुख असून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा निकटवर्तीय मानला जातो. पोलिसांनी त्याच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम ४ व ५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश काशिनाथ कुवारे आणि त्यांच्या पथकाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १:४५ वाजता शेलोडी शिवारातील एका टीनशेडवर अचानक छापा टाकला. यावेळी तेथे 'एक्का-बादशहा' हा जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून घटनास्थळावरील आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संजय देवमन शेगोकार (रा. कवठा, ता. बाळापूर), सुनील राजेंद्र भोजने (रा. तिंत्रव, ता. शेगाव), शुभम दिलीप भोजने (रा. तिंत्रव, ता. शेगाव), अमोल रमेश मुंडाले (रा. तिंत्रव, ता. शेगाव), सचिन मधुकर मोहाडे (रा. शेलोडी, ता. खामगाव), प्रभाकर सुखदेव तायडे (रा. शेलोडी), नंदकिशोर प्रल्हाद आरे (रा. शेलोडी), नासीर खाँ बशीर खाँ (रा. शिवपुरा जामोद, ता. जळगाव जामोद), आकाश वसंता हांडे (रा. लोनखेल जामोद, ता. जळगाव जामोद), निवृत्ती भगवान हिंगणे (रा. तिंत्रव, ता. शेगाव), शेख राजीक शेख शफीक (रा. आवार, ता. खामगाव) आणि विनोद जनार्धन जाधव (रा. शेलोडी, ता. खामगाव) यांचा समावेश आहे.
या कारवाईनंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश कुवारे यांच्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २८३/२०२६ नोंदविण्यात आला. महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रतीक्षा जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण राऊत पुढील तपास करत आहेत.