Farmer Land Acquisition: मुधोली चक क्र. २ येथील शेतकर्यांनी शेतांना ड्रोनद्वारे मोजण्याच्या प्रक्रियेला विरोध केला आहे, प्रशासनाने सांगितलेल्या तीन महिन्यांचे स्थगितीचा आदेश नंतरचे कार्य करू शकत नाही.
जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर मुधोली चक क्र. २ येथील शेतकरी आक्रमक
चामोर्शी/गडचिरोली (Farmer Land Acquisition) : एमआयडीसाठी जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्र. २ येथील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अधिग्रहण प्रक्रियेला तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आल्याचे सांगितले जात असतानाही ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला संतप्त शेतकर्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, (Farmer Land Acquisition) जमीन अधिग्रहणाच्या प्रस्तावामुळे मुधोली चक क्र. २ येथील शेतकरी मागील काही काळापासून विरोध करत आहेत. शेतकर्यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाकडून या प्रक्रियेला तीन महिन्यांची स्थगिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही ड्रोनच्या माध्यमातून जमिनीची मोजणी करण्यासाठी पथक दाखल झाल्याने शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ड्रोन सर्वेक्षणासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले. जमीन अधिग्रहण प्रक्रियेला स्थगिती असताना मोजणी करण्याचे आदेश कोणत्या स्तरावरून देण्यात आले, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली. जमिनीशी संबंधित निर्णय घेताना शेतकर्यांच्या भावना आणि अडचणींचा विचार करणे आवश्यक आहे. कोणतीही स्पष्ट माहिती न देता सर्वेक्षण किंवा मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध केला जाईल, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाच्या अधिकार्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने चर्चेत तातडीने तोडगा निघू शकला नाही. या वेळी ग्रामपंचायत परिसरात मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी जमा झाले होते. अधिग्रहणाबाबत स्पष्ट निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रकारची मोजणी, सर्वेक्षण किंवा पुढील प्रक्रिया होऊ देणार नाही, असा इशारा शेतकर्यांनी दिला.
जमीन अधिग्रहणाचा (Farmer Land Acquisition) विषय आधीपासूनच संवेदनशील बनला असून, प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. आता प्रशासनाकडून या प्रकरणी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे मुधोली चक क्र. २ परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्थगितीनंतरही मोजणीचा प्रयत्न का? शेतकर्यांचा सवाल
जमीन अधिग्रहण प्रक्रियेला स्थगिती (Farmer Land Acquisition) देण्यात आल्याचे सांगण्यात आले असताना ड्रोन सर्वेक्षणासाठी पथक पाठविण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे. प्रशासनाने अधिग्रहण प्रक्रियेबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करून शेतकर्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.