Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

रिसोड तालुक्यात इंधन ‘आणीबाणी’; प्रशासन म्हणते ‘ऑल इज वेल’, मग पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक का?

रिसोड शहरासह संपूर्ण तालुक्यात डिझेलसाठी ग्राहकांना थेट ‘आणीबाणी’ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.


रिसोड तालुक्यात इंधन ‘आणीबाणी’ प्रशासन म्हणते ‘ऑल इज वेल’ मग पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक का

Fuel Crisis |

४५ अंशाच्या पार गेलेल्या पाऱ्यात शेतकरी, नागरिक ताटकळत; प्रशासकीय दुर्लक्षामुळे संताप

रिसोड (Fuel Crisis) : मागील काही दिवसांपासून रिसोड शहरासह संपूर्ण तालुक्यात डिझेलसाठी ग्राहकांना थेट ‘आणीबाणी’ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग जिल्ह्यात ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे बहुतांश पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी आणि त्यानंतर लगेच ‘पेट्रोल-डिझेल संपले’चे फलक झळकत आहेत. “प्रशासनाचा दावा खरा की पंपांवरील फलक?” असा यक्ष प्रश्न सध्या तालुक्यातील नागरिक आणि ग्राहकांसमोर उभा ठाकला आहे. या गंभीर इंधन टंचाईमुळे चालू हंगामातील शेती मशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, हवालदिल झालेला शेतकरी आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे आशेने पाहत आहे.

मागील महिनाभरापासून तालुक्यातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा कमालीचा तुटवडा जाणवत आहे. सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला असून, या कडक उन्हात तासनतास रांगेत उभे राहणाऱ्या ग्राहकांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. सध्या शेती मशागतीचे दिवस असल्याने डिझेलला प्रचंड मागणी आहे. रिसोड शहरात सध्या तासाला सुमारे १० हजार लिटर डिझेलचा खप होत असून, पंपावर इंधन उपलब्ध होताच खरेदीसाठी ग्राहकांच्या झुंबडी उडत आहेत.

तीन ते चार तास उन्हात डिझेलसाठी उभे राहून शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपयांचे डिझेल स्थानिक प्रशासनाच्या तोंडी सूचनेने पेट्रोल पंप चालकांकडून वाटप केले जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. अवघ्या दोनच तासांत इंधन संपत असल्याने अनेक पंपांवर वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. काही पंप चालक इंधन विक्रीसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना डावलून केवळ ओळखीच्या व्यक्तींना प्राधान्य देत असल्याचा गंभीर आरोपही ग्राहकांकडून होत आहे.

प्रशासन विविध शासकीय कामांवर कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गाला इंधन मिळण्यासाठी प्राधान्य देत आहे. मात्र, दुसरीकडे देशाचा कणा असलेल्या आणि सध्या मशागतीच्या कामात व्यग्र असलेल्या शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा आरोप होत आहे. इंधनाअभावी ट्रॅक्टर व इतर यंत्रे जागेवरच उभी असल्याने शेतकरी वेठीस धरला गेला आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांप्रमाणेच शेतकऱ्यांनाही इंधन पुरवठ्यात प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

पंपावर तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर अचानक ‘स्टॉक खतम’चा बोर्ड लागत असल्याने शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचा मोठा हिरमोड होत आहे. यावर तोडगा म्हणून, ज्याप्रमाणे रेशन दुकानांवरील धान्याची माहिती मिळते, त्याच धर्तीवर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर उपलब्ध पेट्रोल-डिझेलच्या दैनंदिन साठ्याची माहिती ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना SMS द्वारे किंवा ऑनलाइन डिजिटल बोर्डवर मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

या ज्वलंत प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन तातडीने काही ठोस उपाययोजना करणार का, की शेतकऱ्यांना या कडक उन्हात असेच हवालदिल सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(प्रशासनाचे स्पष्टीकरण)
डेपोमध्ये इंधनाचा मुबलक साठा असून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा कंपन्यांकडून सुरळीत सुरू आहे. मात्र, रिसोड तालुक्यात अचानक मागणी वाढल्याने किंवा काही ठिकाणी भीतीपोटी इंधनाची साठवणूक वाढली आहे. पुरवठा सुरळीत होण्यासाठी तालुकास्तरावर समिती नेमण्यात आली आहे. सामान्य शेतकऱ्यांना इंधन नाकारल्याच्या तक्रारी आल्यास, पुरवठा विभागामार्फत संबंधित पंपाची तात्काळ चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना मशागतीच्या कामांसाठी प्राधान्याने डिझेल मिळावे, यासाठी स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
— जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशीम.

Related to this topic: