अध्यक्ष गौतम मुंढे यांच्या सुजाता नगर येथील घरावर जयंती मिरवणुकीच्या वादाच्या रागातून बुधवार १५ एप्रिल रोजी दोघांनी हल्ला करून एकाने स्वतःच्या पिस्तूल मधून पाच फायरिंग केल्याची घटना घडली.
जयंती मिरवणुकीत झाला होता वाद
परभणी (Firing Incident) : पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे मराठवाडा अध्यक्ष गौतम मुंढे यांच्या सुजाता नगर येथील घरावर जयंती मिरवणुकीच्या वादाच्या रागातून बुधवार १५ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजता दोघांनी हल्ला करून एकाने स्वतःच्या पिस्तूल मधून पाच फायरिंग केल्याची घटना घडली. फायरिंग करणारा विलास बनसोडे यास पोलिसांनी अटक केली असून नानलपेठ पोलीस ठाण्याकडून पुढील तपास चालू आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात परभणी जिल्ह्यात साजरी करण्यात आली. शहरामध्ये देखील जयंतीला कुठेही गालबोट लागली नाही. परंतु सुजाता नगर पेडगाव रोड येथून निघालेल्या जयंती मिरवणुकी दरम्यान जयंती पुढे घेण्याच्या कारणावरून गौतम मुंढे व विलास बनसोडे यांच्या किरकोळ वाद झाला. या वादा नंतर मिरवणूक शांततेत पार पडली. मात्र झालेला वाद लक्षात ठेवून बनसोडे यांनी गौतम मुंढे यांच्या मुलाला कॉल करून तुझ्या बापाचे पाय तोडतो, कुठे आहे तुझा बाप अशी धमकी दिली. त्यानंतर बनसोडे यांनी गौतम मुंढे यांच्या घरी येऊन आपल्या स्वतःच्या रिव्हॉलवर मधुन पाच फेर्या गोळया झाडल्या. पिस्तुलातून निघालेल्या गोळ्या भिंतीला व घराच्या काचांवर लागून काचा फुटल्या. घरातील कुठल्याही सदस्याला हानी झाली नाही परंतु कुटुंबातील सदस्य प्रचंड दहशतीखाली ओरडत होते.
या घटनेची माहिती पोलिसांना कळतात पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली तसेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी देखील तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी ऑडिट नगर मधील विलास रतन बनसोडे यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. या घटनेमुळे सुजाता नगरासह संपूर्ण परभणी शहरात दहशतीचे वातावरण पसरले. नानलपेठ ठाण्यात बनसोडे व आणखी एक जणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे संपूर्ण मुंढे कुटुंब नानलपेठ पोलीस ठाण्यात बसून असून त्यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे.

आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - गौतम मुंढे
विलास बनसोडे हा परिसरात गुंडागर्दी करतो. जयंती मिरवणूक दरम्यान किरकोळ वाद झाल्यानंतर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्याने मनात राग धरून घरावर हल्ला केला. अशा गुंडावर कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे अशी प्रतिक्रिया गौतम मुंढे यांनी देशोन्नती शी बोलताना दिली