जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगावदेवी येथे कर्जाच्या विवंचनेत असलेल्या एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने जलजीवन योजनेच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
जिंतूर पोलिसांत घटनेची नोंद; कर्जफेडीच्या चिंतेत होते शेतकरी
परभणी (Farmer Suicide) : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगावदेवी येथे कर्जाच्या विवंचनेत असलेल्या एका ६५ वर्षीय शेतकऱ्याने जलजीवन योजनेच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवार (२९ जून) रोजी सकाळी समोर आली.
मयत शेतकऱ्याचे नाव प्रसाद सोनेराव जगताप (वय ६५) असे आहे. त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच्या चिंतेमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे.
रविवार (२८ जून) रोजी सकाळी शेतीच्या कामासाठी जात असल्याचे सांगून प्रसाद जगताप घराबाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. गावाजवळील जलजीवन योजनेच्या विहिरीजवळ त्यांची चप्पल आणि काठी आढळून आल्याने संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलीस ठाण्याचे पोउपनि. मुजमुले आणि बीट जमादार नसीब खान पठाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पातूड येथील गोताखोर आणि ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, जिंतूर येथे हलविण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंगळे यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मयताचे भाऊ लक्ष्मीकांत सोनेराव जगताप यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात खबर दिली असून पुढील तपास सपोनि. महीपळे करत आहेत.