आखाडा बाळापूर येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘शेतकरी भवन’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आखाडा बाळापूर बाजार समितीत शेतकरी भवन उभारणीला हिरवा कंदील
आखाडा बाळापूर (Farmer Bhavan Project) : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘शेतकरी भवन’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती बाजार समितीचे सभापती दत्ता संजय बोंढारे यांनी दिली.
राज्य शासनाच्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ योजनेअंतर्गत या इमारतीच्या बांधकामासाठी १ कोटी ५२ लाख ९१ हजार ९७० रुपयांच्या अंदाजपत्रकास सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने २३ एप्रिल रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात. मात्र, लांबच्या अंतरामुळे किंवा व्यवहारात होणाऱ्या विलंबामुळे त्यांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. अशा वेळी निवास व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना विशेषतः पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर, ज्या बाजार समित्यांमध्ये अशा सुविधा उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी प्राधान्याने शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
आखाडा बाळापूर बाजार समितीने सादर केलेल्या प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यास मान्यता मिळाली असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
माजी सभापती संजय पाटील बोंढारे तसेच आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या योजनेमुळे बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या सुमारे १२० गावांतील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी भवनासोबतच शेतकरी हितासाठी विविध उपक्रम आणि योजना राबविण्याचाही मानस असल्याचे सभापती दत्ता पाटील बोंढारे यांनी सांगितले.