El Niño Crisis: 'एल निनो'मुळे आणखी एक दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पशुपालकांना पोषक चारा पिकांची निवड आणि मुरघास साठवून ठेवणे आवश्यक आहे
पोषक चारा पिकांची लागवड, मुरघास निर्मिती व चारा साठवणुकीचे आवाहन;
पशुवैद्यकीय सेवांसाठी १९६२ हेल्पलाईन उपलब्ध
हिंगोली (El Niño Crisis) : जागतिक हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील सर्व पशुपालकांनी आतापासूनच चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. ‘एल निनो’मुळे उद्भवू शकणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचा पशुधन व दुग्धोत्पादनावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी पशुपालकांनी पोषक व बहुउद्देशीय चारा पिकांची निवड करावी. गाई-म्हशींचे आरोग्य आणि दूध उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी अशा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे, ज्यातून मुख्य पीक उत्पादनाबरोबरच दर्जेदार चाऱ्याचीही उपलब्धता होईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरील किंवा पडीक जमिनीवरील नैसर्गिक गवताचे संवर्धन करून त्याचा योग्य वापर करावा. पावसाची कमतरता किंवा चारा टंचाईच्या काळात हेच गवत जनावरांसाठी महत्त्वाचे खाद्यस्रोत ठरू शकते. त्यामुळे उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चारा उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उत्पादित अतिरिक्त चारा ‘मुरघास’ (सायलेज) किंवा सुक्या चाऱ्याच्या स्वरूपात साठवून ठेवण्याचा सल्लाही पशुसंवर्धन विभागाने दिला आहे. खरीप व रब्बी हंगामातील चारा पिकांचे सायलेज तंत्रज्ञानाद्वारे जतन केल्यास फेब्रुवारी ते जून २०२७ या संभाव्य टंचाईच्या कालावधीत जनावरांच्या खाद्याची गरज भागविणे शक्य होणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांबाबत पशुपालक व शेतकरी बांधवांना विविध माध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येत असून, पशुधनाच्या आरोग्य संरक्षणासाठी विभाग सज्ज असल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
पशुपालकांनी कोणत्याही प्रकारच्या शंका किंवा अडचणींसाठी पशुसंवर्धन विभागाच्या १९६२ या कॉल सेंटर क्रमांकावर संपर्क साधून आवश्यक माहिती तसेच पशुवैद्यकीय सेवा प्राप्त कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे. योग्य नियोजन, पोषक चारा पिकांची निवड आणि उपलब्ध चाऱ्याची प्रभावी साठवणूक यामुळे पशुधनाचे पोषण आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.