अकोल्यातील आदर्श कॉलनीमध्ये सशस्त्र दरोडा; एकट्या दरोडेखोराने २० लाखाचा ऐवज लुटला, पोलिसांच्या सर्च ऑपरेशन सुरू.
बंदूक-कोयत्याचा धाक दाखवत एकट्या दरोडेखोराची धाडसी कारवाई; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अकोला : शहरातील खदान पोलीस स्टेशन हद्दीतील गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकाजवळ असलेल्या गजबजलेल्या आदर्श कॉलनीत गुरुवारी भरदिवसा थरारक सशस्त्र दरोडा पडला. सप्तश्रृंगी ज्वेलर्समध्ये घुसलेल्या एका अज्ञात दरोडेखोराने बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवत तब्बल २० लाख रुपयांचा ऐवज लुटून दुचाकीवरून पलायन केले. या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, दरोडेखोर एकटाच असूनही संपूर्ण प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. परिसरातील व्यापाऱ्यांनाही घटनेची चाहूल लागली नाही. आरोपी पसार झाल्यानंतर जितेंद्र विसपुते यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील व्यापाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला; मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम हाती घेतली आहे.
ग्राहक बाहेर पडताच दरोडेखोराचा प्रवेश
आदर्श कॉलनीतील उटांगळे मंगल कार्यालयाजवळ जितेंद्र विसपुते यांचे सप्तश्रृंगी ज्वेलर्स आहे. गुरुवारी दुपारी विसपुते दुकानात एकटेच होते. त्याचवेळी एक ग्राहक दुकानात आला होता. ग्राहक बाहेर पडताच दबा धरून बसलेल्या दरोडेखोराने शेजारील घराजवळ दुचाकी उभी करून थेट दुकानात प्रवेश केला.
दुकानात शिरताच आरोपीने बंदूक रोखून आणि कोयता दाखवत विसपुते यांना धमकावले. अवघ्या काही मिनिटांत दुकानातील सुमारे ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड बॅगेत भरून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
रेकी करूनच टाकला दरोडा!
संपूर्ण परिसराची आधी रेकी करूनच हा दरोडा टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. सप्तश्रृंगी ज्वेलर्ससमोर मोठी मोकळी जागा असून, दुकानाच्या एका बाजूला घर तर दुसऱ्या बाजूची दोन दुकाने बंद होती. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केल्याचे समोर आले आहे.
सिनेस्टाइल पद्धतीने लूट
दुचाकीवर आलेल्या दरोडेखोराने दुकानातील ग्राहक बाहेर पडण्याची वाट पाहिली. चौकात शांतता निर्माण होताच त्याने थेट दुकानात घुसून बंदूक आणि कोयत्याचा धाक दाखवत सोन्याचे दागिने, चांदी आणि रोकड लुटली. संपूर्ण घटना काही मिनिटांत घडल्याने व्यापारी वर्ग हादरला आहे.
एकटा दरोडेखोर पोलिसांवर भारी
एकट्या दरोडेखोराने नियोजनबद्ध पद्धतीने दरोडा टाकून पोलिसांनाच खुले आव्हान दिल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या गोरक्षण रोडवरील उच्चभ्रू आदर्श कॉलनीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.