आज सकाळी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे हादरे बसले.
नांदेड (Earthquake News) : आज सकाळी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला भूकंपाचे हादरे बसले. ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली.रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.७ इतकी मोजण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावाच्या उत्तरेला आणि पांगरा शिंदे जवळील सोनवाडी परिसरात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुरे यांनी दिली आहे.हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जमिनीच्या आत होणाऱ्या या हालचालींचे तीव्र पडसाद शेजारील नांदेड जिल्ह्यातही उमटले. नांदेड शहरासह परिसरात हे हादरे स्पष्टपणे जाणवले आहेत.
आज बसलेला हा धक्का मध्यम स्वरूपाचा असला तरी, सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी घाबरून जावू नये असेआवाहन करण्यात आले आहे.
नांदेड शहराला भूकंपाचे अधुन - मधून धक्के जाणवण्याची घटना सन २००७ पासून सुरू आहे ३ मार्च २०२४ सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटाला नांदेड शहराला १.५ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता.त्यानंतर पुन्हा १८ दिवसांनी २१ मार्च २०२४ रोजी सकाळी नांदेड शहरासह जिल्ह्यात भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते.तेव्हा पासून या भूकंपाच्या हादरे अधून मधून सुरूच आहेत.
दरम्यान, गेल्या २ वर्षापासून नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील परिसरात वारंवार भूकंपाचे सौम्य हादरे बसत आहेत. वारंवार होणाऱ्या या भौगोलिक हालचालींमुळे नांदेड आणि हिंगोली परिसरातील नागरिक काहीसे चिंतेत आहेत.आज सकाळी हिंगोली आणि नांदेडला बसलेल्या हादऱ्यामुळे भीतीपोटी अनेकांनी घराबाहेर धाव घेतली होती.