शहरातील स्वच्छता राखण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
हिंगोली (Dustbin Distribution) : शहरातील स्वच्छता राखण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत वाढत चाललेली अस्वच्छता लक्षात घेऊन तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिन (कचरा कुंडी) प्रत्यक्ष त्यांच्या दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. हा उपक्रम नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केवळ दंडात्मक कारवाई करण्याऐवजी व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी करून घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले.
या उपक्रमाचा शुभारंभ कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेची नाही, तर प्रत्येक नागरिक आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करून पालिकेला सहकार्य करावे,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाला नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष माबुद बागवान, नगरसेवक सुभाष बांगर (मानकरी), युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, नगरसेवक गणेश बांगर, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, रवींद्र वाढे, डॉक्टर निधी गोरे, डॉक्टर सुरभी चौधरी, रामकिसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोटरे आदींची उपस्थिती होती. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.
प्रतिक्रिया :
“बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला ‘नंबर वन’ करण्यासाठी सहकार्य करावे.”
— सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली.