वर्धा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत रेल्वे मंत्रालयाने वर्धा स्थानकावर दुरांतो एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा मंजूर केला आहे.
वर्धा (Duronto Express Stop) : वर्धा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत रेल्वे मंत्रालयाने वर्धा स्थानकावर दुरांतो एक्सप्रेसला प्रायोगिक तत्वावर थांबा मंजूर केला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाली असून आता प्रवाशांना नागपूर किंवा बडनेरा गाठण्याची गरज उरणार नाही, त्यामुळे वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.
रेल्वे बोर्डाने 27 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार 12289/12290 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरांतो एक्सप्रेस या नागपूर–मुंबई–नागपूर मार्गावरील महत्त्वाच्या गाडीचा वर्धा येथे थांबा देण्यात येणार आहे. ही माहिती ZRUCC मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रणव जोशी यांनी दिली.
दुरांतो एक्सप्रेस ही मुंबईकडे जाण्यासाठी अत्यंत सोयीची गाडी मानली जाते. मात्र वर्धा येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांना या गाडीचा लाभ घेण्यासाठी नागपूर किंवा बडनेरा गाठावे लागत होते. त्यामुळे वेळेचा अपव्यय आणि अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. विशेषतः सायंकाळची गाडी असल्याने दिवसभराचे काम आटोपून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही गैरसोय अधिक जाणवत होती. आता वर्धा स्थानकावर थांबा मिळाल्याने प्रवाशांना थेट येथूनच या सोयीस्कर गाडीचा लाभ घेता येणार आहे.
नागरिकांनी मुंबईला जाताना दुरांतोचे तिकीट वर्धा स्थानकावरूनच जास्तीत जास्त प्रमाणात काढावे, जेणेकरून भविष्यात हा थांबा कायम राहण्यास मदत होईल, असे आवाहन प्रणव जोशी यांनी केले. तसेच बोर व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीही वर्धा स्थानकावरूनच प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
याशिवाय शेगाव येथे 22109/22110 लोकमान्य टिळक टर्मिनस – बल्हारशाह एक्सप्रेस, तसेच उरुली येथे 12629/12630 यशवंतपूर – हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस, 22685/22686 यशवंतपूर – चंदीगड एक्सप्रेस आणि 12135/12136 पुणे – नागपूर एक्सप्रेस या गाड्यांनाही थांबा देण्यात येणार आहे.
हे सर्व थांबे “लवकरच सोयीस्कर तारखेपासून” लागू करण्यात येणार असून रेल्वे प्रशासनाने अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्याच्या रेल्वे सेवेत सुधारणा होऊन प्रवाशांना अधिक सुलभ व किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.