Navardev Dead Body: भावी नवरदेवाचा विहिरीत मृतदेह सापडल्याने वायचाळ पिंपरी गावावर दुःखाचं सावट. लग्नाच्या तयारीत असताना घटना घडली.
सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी गावावर शोककळा
बासंबा पोलीस ठाणे हद्दीतील आंबाळा शिवारातील घटना
हिंगोली (Navardev Dead Body) : सनई-चौघड्यांचे सूर घुमण्याऐवजी आक्रोशाने वायचाळ पिंपरी गाव सुन्न झालं. सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरीचा ओम अशोक वायचाळ (२५) या भावी नवरदेवाचा आंबाळा शिवारातील प्रकाश इंगोले यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला.
ओम वायचाळ हा एकुलता एक मुलगा, तीन बहिणींच्या लग्नानंतर आईच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ओम हिंगोली तालुक्यातील एका गावी त्याचं लग्न ठरलं होतं. १० मे रोजी लग्नाची तारीख होती. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. लग्नाच्या काही दिवस आधी ओमची तब्येत बिघडली. वाशीमच्या रुग्णालयात उपचार घेऊन तो बरा झाला, म्हणून आनंदाने कुटुंबाने १४ मे ही नवीन तारीख ठरवली. घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. आईच्या डोळ्यात मुलाच्या बोहल्यावर चढण्याचं स्वप्न होतं. मात्र ७ मे, गुरुवारची ती संध्याकाळ काळ ठरली.
सायंकाळी घरी येऊन, हातपाय धुऊन जेवण करून ओम ‘शेतात हळदीकडे जाऊन येतो’ असं सांगून बाहेर पडला. तो पुन्हा परतलाच नाही. रात्रभर कुटुंबाने गावभर शोध घेतला. शोध लागेना म्हणून गोरेगाव पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी ११ मे रोजी सकाळी आंबाळा शिवारातील प्रकाश इंगोले यांच्या विहिरीत ओमचा मृतदेह तरंगताना दिसला. १० किमी दूर सापडलेल्या (Navardev Dead Body) मृतदेहाची बातमी वार्यासारखी पसरली आणि वायचाळ पिंपरीवर दुःखाचा डोंगर कोसळला. बासंबा ठाण्याचे सपोनि विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेहाची ओळख पटवून उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री साडेदहा वाजता ज्या अंगणात मांडव पडायचा होता, त्याच अंगणातून ओमची शेवटची यात्रा निघाली. आईच्या आक्रोशाने काळीज पिळवटून निघत होतं. ओमच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून गुलदस्त्यात आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यावरच सत्य समोर येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. बासंबा पोलिस ठाण्यात अद्याप गुन्ह्याची नोंद झालेली नाही. गुरुवारी लग्न मांडवात मंगलाष्टकांऐवजी घरात शोकसागर पसरला आहे. (Navardev Dead Body) एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने वायचाळ कुटुंब उद्ध्वस्त झालं असून संपूर्ण वायचाळ पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे.