तालुक्यातील कापडसिंगी येथे अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमावर सेनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत ४ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
कापडसिंगीत गांजा तस्करीवर सेनगाव पोलिसांचा मोठा प्रहार
सेनगाव (Drug Trafficking) : तालुक्यातील कापडसिंगी येथे अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमावर सेनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत ४ किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत अंदाजे २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ग्रामीण भागात वाढत्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. कापडसिंगी येथील लोणार रोड परिसरात एक इसम गांजा बाळगून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती सेनगाव पोलीस ठाण्याला मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यातील आरोपी ताब्यात, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
पथकाने घटनास्थळी जाऊन सापळा रचला. संशयित इसमाची चौकशी व झडती घेतली असता त्याच्याकडे अवैधरित्या गांजा साठवून ठेवलेला आढळून आला. आरोपीची ओळख नंदाजी मोहन चव्हाण (रा. खुरामपूर, ता. लोणार, जि. बुलढाणा) अशी पटली आहे.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ४.८०० किलो गांजा (अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये), एक मोटारसायकल (किंमत ७० हजार रुपये) आणि एक मोबाईल फोन (किंमत १० हजार रुपये) असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही संपूर्ण कारवाई पंचांसमक्ष करण्यात आली असून घटनास्थळीच जप्ती पंचनामा करण्यात आला.
या कारवाईत नायब तहसीलदार कारगुडे, कृषी सहाय्यक सूर्यवंशी, ग्राम अधिकारी श्री. मुंडे, देवकते तसेच पोलीस कर्मचारी जीवन मस्के, तुळशीराम वंजारे, थिटे, पोलीस नाईक जैस्वाल, चालक गजानन मुटकुळे, पोलीस शिपाई गजानन सरकटे, वजन मापारी शंकर तिडके, फोटोग्राफर व फॉरेन्सिक टीम यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गांजाची तस्करी नेमकी कुठून होत होती, यामागे आणखी कोणते जाळे कार्यरत आहे का, तसेच या प्रकरणात इतर साथीदारांचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.