सिंदखेडराजा नगरीतील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उदात्त हेतूने सिंदखेडराजा नगर परिषदेने एक मोठे आणि धाडसी पाऊल उचलले आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराला आता मिळणार स्वच्छ व शुद्ध पाणी; नगर परिषदेचे मोठे पाऊल
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा नगरीतील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उदात्त हेतूने सिंदखेडराजा नगर परिषदेने एक मोठे आणि धाडसी पाऊल उचलले आहे. शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ विजय तायडे यांनी समयसूचकता दाखवत, गेल्या १५ ते २० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या मुख्य टाकीमध्ये साठलेला तब्बल अडीच ते तीन फूट कचरा व गाळ प्रत्यक्ष पाहणी करून साफ करून घेतला आहे. यामुळे आता सिंदखेडराजा शहरवासीयांना शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.

१५ ते २० वर्षांच्या दुर्लक्षामुळे झाली होती दयनीय अवस्था
सिंदखेडराजा शहराला खडकपूर्णा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. या नदीमधून मुख्य जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याचे फिल्टरेशन केले जाते. मात्र, हे जलशुद्धीकरण केंद्र अत्यंत जुने झाल्याने त्याची पाणी फिल्टर करण्याची क्षमता कमी झाली होती. परिणामी, नदीतील गाळ तसेच पाणी शुद्धीकरणासाठी टाकीत वारंवार वापरण्यात येणारी तुरटी, जंतुनाशक पावडर व केमिकल्सचे अंश गेल्या १५ ते २० वर्षांपासून टाकीच्या तळाशी साठत गेले. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे टाकीमध्ये अडीच ते तीन फूट दूषित गाळ साचला होता, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.

नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी; स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर
नागरिकांचे आरोग्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, हा ध्यास घेऊन नगराध्यक्ष सौरभ तायडे, पाणीपुरवठा सभापती कृष्णा माणिक मेहेत्रे, पाणीपुरवठा अभियंता शिंगणे मॅडम तसेच नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष युद्धपातळीवर काम सुरू केले.

पाण्याच्या टाकीत उतरून साचलेला संपूर्ण अडीच ते तीन फूट गाळ उपसून काढण्यात आला. टाकीची केवळ साफसफाईच नव्हे, तर संपूर्ण निर्जंतुकीकरण (क्लोरीनेशन) करण्यात आले आहे. तसेच आवश्यक असलेली दुरुस्तीची कामेही तातडीने हाती घेण्यात आली आहेत.
नियोजनानुसार नियमित होणार स्वच्छता
नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आता पाणीपुरवठा व्यवस्थेत कायमस्वरूपी सुधारणा व गुणवत्ता नियंत्रण ठेवण्याचा संकल्प केला आहे. यापुढे अशा प्रकारची दयनीय अवस्था होणार नाही, यासाठी नियमित स्वच्छता व देखभालीची नियोजनबद्ध मोहीम राबवली जाईल, अशी ग्वाही नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या धडक मोहिमेमुळे सिंदखेडराजा शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष व त्यांच्या टीमचे विशेष आभार मानले आहेत.
"स्वच्छ पाणी – निरोगी नागरिक" हेच आमचे ध्येय
"गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या टाकीत साठलेला गाळ साफ करणे अत्यंत गरजेचे होते. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही. या स्वच्छता कामादरम्यान नागरिकांना काही काळ पाणीपुरवठा अभावी गैरसोय होऊ शकते, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. परंतु भविष्यात अधिक सुरक्षित आणि दर्जेदार पाणीपुरवठा करण्यासाठी सिंदखेडराजावासीयांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे."
— मा. श्री. सौरभ विजय तायडे
लोकनियुक्त नगराध्यक्ष