प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि समाजसेवक डॉ. आनंद नाडकर्णी (वय ६८) यांचे दीर्घ आजारानंतर शुक्रवारी सकाळी निधन झाले.
ठाणे (Dr Anand Nadkarni) : प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ, लेखक आणि समाजसेवक डॉ. आनंद नाडकर्णी (वय ६८) यांचे दीर्घ आजारानंतर शुक्रवारी सकाळी निधन झाले. मागील आठवड्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले, अशी माहिती ठाणे येथील Institute for Psychological Health (IPH) या संस्थेतील सूत्रांनी दिली.
डॉ. नाडकर्णी यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शुक्रवार १५ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आज सकाळी १०.३० वाजता ठाणे येथील सप्तसोपान येथे ठेवण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार दुपारी ठाणे येथे होणार असल्याची माहिती IPH कडून देण्यात आली.
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात जन्मलेले डॉ. आनंद मधुसूदन नाडकर्णी यांचा जन्म 1958 मध्ये झाला. यांनी मुंबईत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई विद्यापीठातून मानसोपचारशास्त्रात एमडी पदवी प्राप्त केली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ते मानसोपचार क्षेत्रात सक्रिय होते. मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीसाठी त्यांनी समाजातील विविध स्तरांवर सातत्याने कार्य केले.
1990 मध्ये त्यांनी ठाणे येथे Institute for Psychological Health (IPH) ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली, ज्यामध्ये सध्या 70 पेक्षा अधिक मानसिक आरोग्य तज्ज्ञ कार्यरत आहेत. तसेच पुण्यातील ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’चे ते सहसंस्थापक आणि विश्वस्त होते. व्यसनमुक्ती व पुनर्वसन क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
साहित्य आणि नाट्य क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला होता. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या त्यांच्या साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘असेच आम्ही सारे’ ही नाटके त्यांनी लिहिली असून ‘मयसभा’ या नाटकाला विशेष गौरव प्राप्त झाला. त्यांच्या संकल्पनेवर आधारित ‘गेट वेल सून’ या नाटकाची मिफ्ता नाट्य विभागात त्या वर्षातील सर्वोत्तम १० नाटकांमध्ये निवड झाली होती.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त “देवराई” आणि राज्य पुरस्कारप्राप्त “कदाचित” या चित्रपटांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले होते. मानसिक आरोग्य, सर्जनशीलता आणि समाजप्रबोधन यांचा अनोखा संगम त्यांच्या कार्यातून दिसून येत होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना बहुआयामी व्यक्तिमत्त्व असे संबोधले. शिंदे यांनी X वरील संदेशात म्हटले की, “असीम ऊर्जा आणि आनंदी व्यक्तिमत्त्व लाभलेले डॉ. नाडकर्णी हे ठाण्याचे लाडके सुपुत्र होते. मागील साडेतीन दशकांपासून त्यांनी मानसोपचार क्षेत्रात अविरत कार्य केले.”
तसेच दिवंगत डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत त्यांनी पुण्यात मुक्तांगण ही संस्था उभारली, जी सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांसाठी एक आदर्श ठरली.
“डॉ. नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्य ही संकल्पना समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवली. हिंदू तत्त्वज्ञान, इतिहास, तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रमांमधून त्यांचा बहुआयामी दृष्टिकोन अतुलनीय होता,” असे सहकाऱ्यांनी सांगितले.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.