कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर मंदिरातील दानपेटी फोडून सी सी टी व्ही चे डिव्हाईस दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना काल रात्री दिनांक 23 एप्रिल रोजी घडली.
डोंगरकडा (Dongarkada Temple Theft) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. २३ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली तसेच सीसीटीव्ही यंत्रणेशी संबंधित उपकरणेही चोरून नेली.
डोंगरकडा येथील स्वयंभू श्री जटाशंकर मंदिर हे परिसरातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, राज्य शासनाने यास “क” दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून मान्यता दिली आहे. मंदिरातील प्राचीन आणि दुर्मिळ अशी स्वयंभू मूर्ती असल्याने येथे भाविकांची मोठी वर्दळ असते. याशिवाय, परिसरातील अनेक विवाहसोहळेही या ठिकाणी पार पडतात.
ही घटना मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर अधिकृत कर्मचाऱ्यांनी तात्काळ विश्वस्त मंडळाला माहिती दिली. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब अडकीने यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.
घटनास्थळी पोलीस पथकासह फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात चोरट्यांनी दानपेटी फोडण्यासाठी कटरचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपी अनुभवी आणि नियोजनपूर्वक कारवाई करणारे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.