District AIDS Prevention: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
एचआयव्ही संसर्ग प्रतिबंधासाठी तपासणी व उपचार सेवांवर भर : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (District AIDS Prevention) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, तपासणी व उपचार कार्यक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी श्रीमती कोरडे, समाज कल्याण विभागाच्या श्रीमती पी. पी. गीते, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठुळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत निर्धारित पहिले 95 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिजोखीम गटातील व्यक्तींची एचआयव्ही तपासणी वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सर्व गर्भवती महिलांची एचआयव्ही, गुप्तरोग (सिफिलिस) व काविळ यांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे एआरटी उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एचआयव्ही, सिफिलिस व काविळ तपासणीसाठी आवश्यक किट्स उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी (District AIDS Prevention) जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. त्यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत सामान्य गटातील 4 हजार 304 रुग्णांची व 288 गर्भवती महिलांची नोंद झाली आहे. एकूण 3 हजार 471 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी 2 हजार 25 रुग्णांवर सध्या औषधोपचार सुरू आहेत. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत 24 हजार 944 व्यक्तींची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 75 व्यक्ती एचआयव्ही संसर्गित आढळून आल्या आहेत. तसेच 28 हजार 351 गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 नवीन तर 17 पूर्वीपासून एचआयव्ही संसर्गित असल्याचे निदर्शनास आले आहे.
एचआयव्ही संसर्गित (District AIDS Prevention) मातांच्या 16 बालकांचे 18 महिन्यांनंतरचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सन 2018-19 पासून आजपर्यंत तपासणी करण्यात आलेली सर्व 94 बालके एचआयव्ही निगेटिव्ह असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्ती तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांना बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान ओळखपत्र आदी विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जात असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. बैठकीचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.