नागरिकांना गुप्त माहिती देण्याचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांचे आवाहन
हिंगोली (Diesel Shortage) : जिल्ह्यात सध्या पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करून कॅन, बाटल्या व इतर भांड्यांमध्ये डिझेल भरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. ही बाब अत्यंत शंकास्पद असून यातून अनेक ठिकाणी डिझेलचा अनधिकृत साठा केला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली आहे.
उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी आज एका निवेदनाद्वारे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, सध्या जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर दैनंदिन गरजेपेक्षा अधिक प्रमाणात डिझेल कॅनमध्ये भरून नेले जात आहे. नियमानुसार पेट्रोल पंपावरून वाहनांच्या टाकीव्यतिरिक्त इतर भांड्यांमध्ये इंधन देण्यास बंदी आहे. तरीही काही ठिकाणी हा नियम डावलला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा प्रकारे अनधिकृतपणे साठवले जाणारे डिझेल काळ्या बाजारात चढ्या दराने विकले जाण्याची किंवा इतर गैरप्रकारांसाठी वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच अपघाताची शक्यता देखील वाढते. कारण डिझेल हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असून त्याचा असुरक्षित साठा धोकादायक ठरू शकतो.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी स्पष्ट केले की, जिल्हा प्रशासन अशा प्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. पेट्रोल पंप चालकांनाही नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर कोणी विनापरवाना कॅनमध्ये डिझेल देत असेल किंवा घेत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
तसेच, नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले, “आपल्या गावात, परिसरात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी डिझेलचा अनधिकृत साठा केला जात असल्याची गुप्त माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल आणि प्राप्त माहितीच्या अनुषंगाने तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
नागरिकांच्या सहकार्यातूनच असे गैरप्रकार रोखणे शक्य आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. माहिती देण्यासाठी नागरिकांनी उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.