Dangerous power poles: पातूरमधील बादशाह नगरमध्ये वीज खांब व तारा धोकादायक अवस्थेत असून, नागरिकांनी दुरुस्तीची मागणी केली आहे. लोकशाही अल्पसंख्याक युवा मंचाने प्रशासनाला निवेदन दिले.
पातूर (Dangerous power poles) : शहरातील शिल्ली ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बादशाह नगर परिसरात वीज खांब व विद्युत तारा अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत लोकशाही अल्पसंख्याक युवा मंचाच्या वतीने विद्युत वितरण विभागाकडे लेखी निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, बादशाह नगर परिसरात काही ठिकाणी वीज खांब व तारा वाकलेल्या व झुकलेल्या अवस्थेत आहेत. संबंधित खांब व तारा केव्हाही कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भागात शेतमजूर, रोजंदारी कामगार तसेच लहान-मोठे व्यावसायिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. तसेच या मार्गावर नागरिकांची सतत ये-जा सुरू असते.
स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा विद्युत विभागाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकशाही अल्पसंख्याक युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष नातिक अहमद शेख यांनी दिलेल्या निवेदनात प्रशासनाने तातडीने पाहणी करून वीज खांब व तारा दुरुस्त कराव्यात, अन्यथा भविष्यात एखादा अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत गटविकास अधिकारी, पंचायत समिती पातूर तसेच तहसीलदार पातूर यांनाही पाठविण्यात आली आहे.