देवगाव रंगारी येथील एका शाळेत गुरुवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर : देवगाव रंगारी येथील एका शाळेत गुरुवारी घडलेल्या धक्कादायक घटनेने शिक्षण क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने किरकोळ वादातून संतापाच्या भरात वर्गातील चार विद्यार्थ्यांवर पॉकेट चाकूने हल्ला केला. या घटनेत चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी गुरुवारी शाळेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास जेवणाची सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थी हात धुण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी एका विद्यार्थ्याचा धक्का वर्गातील काही विद्यार्थ्यांना लागल्याने त्यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला क्षुल्लक असलेला हा वाद काही वेळातच गंभीर स्वरूप धारण करत गेला.
वादानंतर संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने, "थांबा, तुम्हाला बघतोच," अशी धमकी देत वर्गाकडे धाव घेतली. काही वेळाने तो पॉकेट चाकू घेऊन परत आला आणि त्याने वर्गातील चार विद्यार्थ्यांवर अचानक हल्ला केला.
या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या उजव्या दंडावर गंभीर दुखापत झाली. एका विद्यार्थ्याच्या उजव्या पायावर, तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आला. जखमी विद्यार्थी रक्तबंबाळ झाल्याचे पाहून शाळेत एकच गोंधळ उडाला.
घटनेनंतर शाळा प्रशासनाने तातडीने सर्व जखमी विद्यार्थ्यांना गावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमी विद्यार्थ्याला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शाळेतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.