छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी घडलेल्या एका घटनेने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
छत्रपती संभाजीनगरातील निवासस्थानी तणावपूर्ण वातावरण; डीसीपींकडे तक्रार, 'हिट स्प्रे' व्हॉट्सअॅप ग्रुपबाबतही प्रश्न
छत्रपती संभाजीनगरमध्ये कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी घडलेल्या एका घटनेने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भेटीसाठी येणाऱ्या समर्थकांना अडवण्यात येत असल्याचा आरोप करत दिपके यांनी एका पोलीस अधिकाऱ्याच्या वर्तनावर सार्वजनिकरीत्या नाराजी व्यक्त केली. नागरिकांशी उद्धटपणे वागणे स्वीकारार्ह नसल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात पोलीस उपायुक्त (डीसीपी) यांच्याकडे तक्रारही केली.
घटनेदरम्यान अभिजित दिपके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मी कोणाला भेटणार हा निर्णय पोलिसांचा नसून माझा आहे." आपल्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना अडवणे किंवा त्यांच्याशी अयोग्य भाषेत संवाद साधणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.
या वादामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला दिपके यांनी आपल्या घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी थेट पोलीस उपायुक्तांना दूरध्वनी करून संबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवली. "हा अधिकारी मला येथे नको आहे," असेही त्यांनी डीसीपींना सांगितल्याचा दावा केला.
याचवेळी दिपके यांनी आणखी काही गंभीर आरोप केले. त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या काही व्यक्तींनी स्वतःची ओळख सीआयडी अधिकारी म्हणून करून दिल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांनी त्या व्यक्तींना तेथून हटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी "आम्ही सीआयडी अधिकारी आहोत," असे सांगितल्याचा आरोप दिपके यांनी केला.
याशिवाय संबंधित पोलीस अधिकारी 'हिट स्प्रे' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य असल्याचाही आरोप दिपके यांनी केला. "कॉक्रोजना संपवण्यासाठी 'हिट स्प्रे' वापरू, अशा प्रकारची भाषा त्या ग्रुपमध्ये केली जाते. अशा ग्रुपमध्ये अधिकारी सहभागी असतील, तर त्याचा अर्थ काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका मीडिया प्रतिनिधीने संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये 'हिट स्प्रे' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप पाहिल्याचा दावाही त्यांनी केला.
"जर अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये 'हिट स्प्रे' नावाचा ग्रुप असेल, तर ते माझ्या सुरक्षेसाठी येथे उभे नाहीत. सीआयडीचे हे लोक माझ्या घरासमोर उभे राहून व्हॉट्सअॅपवर रिपोर्ट करत आहेत," असा आरोपही अभिजित दिपके यांनी केला.