Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

दत्ताजी मेघे

लोकप्रिय जननेत्याचे दुःखद निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा

Datta Meghe: दत्ताजी मेघे यांचे 89 व्या वर्षी निधन, राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. अनेक नेते व जनसागर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित.


लोकप्रिय जननेत्याचे दुःखद निधन राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा

 

नागपूर (Datta Meghe) : जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता ही ओळख सार्थ ठरवणारे दत्ताजी मेघे (Datta Meghe) यांचे आज सायंकाळी दुःखद निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बातमी कळताच केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी तसेच विविध पक्षाचे अनेक मान्यवर नेते लगेच त्यांच्या निवास्थानी पोहचले. त्याशिवाय विविध पक्षांचे अनेक मंत्री, आमदार, नेते आणि मोठ्या संख्येने शोकाकुल जनसागर त्यांचा अंतिम दर्शनासाठी उसळला होता. 

दत्ताजी मेघे (Datta Meghe)यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने केली होती. लहानपणापासूनच समाजकार्याची ओढ असल्याने त्यांनी आपल्या युवा अवस्थेतच युवक कॅडर नावाची संस्था स्थापन करून विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे सुरु केले आणि विविध जन आंदोलनाचे सक्रिय नेतृत्व केले. शिक्षणासोबतच त्यांचे सामाजिक कार्य सुरु राहिले. बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एल.आई.सी. मध्ये डेव्हलपमेन्ट ऑफिसर म्हणून नौकरी सुरु केली. दरम्यान त्याच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीकडे बघता माननीय शरद पवार यांनी त्यांच्या नेतृत्वाचा गुण हेरून त्यांना दोन्ही सभागृहाचे सदस्य नसतांनाही आणि आपल्या मंत्रिमंडळात १९७८ ,मध्ये त्यांना सरळ मंत्री म्हणून स्थान दिले.

त्यानंतर दत्ताजी मेघे (Datta Meghe) तब्बल चार वेळा राज्यामध्ये मंत्री म्हणून राहिले. तसेच एकदा विधानपरिषदेमध्ये सुद्धा त्यांनी विरोधीपक्ष नेते म्हणून कामकाज पार पडले. १९९१ मध्ये ते नागपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतरची निवडणूक त्यांनी रामटेक आणि वर्धा लोकसभा मतदार संघातून लढवली व ते निवडून आले. त्यांच्या राजकीय करकीर्तीमध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये आमदार नसतांनाही त्यांना २ वेळा मंत्री पद भूषवता आले आणि शिवाय त्यांनी सलग ३ वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघातून ते खासदार म्हणून विजय झाले. हे दोन राजकीय कीर्तिमान त्यांच्या नावे कायम नमूद आहेत. दरम्यान ते राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. आणि त्यांनी शेवटली निवडणूक वर्धा लोकसभा मतदार संघातून लढउन प्रचंड बहुमताने विजय संपादित केला होता.

त्यांनी विदर्भात तंत्रज्ञान आणि वैद्यकिय शिक्षणाला प्रोत्साहन देत नागपूर, वर्धा तसेच संपूर्ण विदर्भात शाळा माहाविद्यालये स्थापित केलीत ज्यामध्ये हजारो गोरगरीब विधार्थ्यानी शिक्षण घेऊन आपल्या पुढील जीवनाचा पाया रचला आहे. या शिवाय अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी कुठलीही बाहेरील आर्थिक मदत न घेता राबवलेले आहेत. शिवाय सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केले त्यांनी सहकारी बँक आणि सूतगिरण्या विदर्भामध्ये सुरु केल्यात. दीनदुबळे, गोरगरीब आणि कार्यकर्त्यांची मुले यांच्यासाठी त्यांची दारे नेहमी उघडी राहायची. त्यांच्या मदतीने अनेकांचे संसार सुखाचे झालेत.

अंत्यविधी पवनार येथे:

आज, दिनांक २३/०३/२०२६ दुपारी ०१.०० वाजेपर्यंत त्याचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्याच्या स्वगृही पांडे लेआऊट खामला, नागपूर येथील निवास्थानी राहणार आहे. दुपारी ०१.०० वाजता त्यांचे पार्थिव सावंगी मेघे येथे नेण्यात येईल. आणि ०२.३० ते ०४.00 वाजेपर्यंत त्याचे पार्थिव सावंगी (मेघे), वर्धा येथील त्यांच्या निवास्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. ०४.0० वा. त्यांची अंत्ययात्रा पवनार येथील त्यांच्या शेताकडे रवाना होईल आणि तेथे त्यांचे शासकीय इतमानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्यभरातून शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे. मा.  नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे, श्री आषीश जैस्वाल, पंकज भोयर, आ. चरण ठाकूर,  नानाभाऊ पटोले,  अभिजित वंजारी जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर, तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती तसेच सामान्य नागरिकांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. “त्यांच्या जाण्याने एक दूरदर्शी आणि जनतेसाठी झटणारा नेता हरपला आहे,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.

यांच्या पश्चात पत्नी शालिनीताई मेघे, माजी आमदार सागर मेघे, आमदार  समीर मेघे, मुली श्रीमती स्मिता मेघे धारकर आणि श्रीमती संगीता मेघे ग्रोवर व स्नूषा श्रीमती देविकाताई सागर मेघे आणि वृंदाताई समीर मेघे व जावई आणि नातवंडे राधिका, राघव मेघे, रिदीमा मेघे, तसेच असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी दि. २३/०३/२०२६  रोजी पवनार  येथे शासकीय सन्मानाने पार पडणार आहे. जनतेच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारा हा जननेता आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांचे कार्य, विचार आणि समाजासाठीची निष्ठा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

Related to this topic: