Dasbodh Study Foundation : दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनतर्फे श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्यावर आधारित दोन नवीन अभ्यासक्रमांची घोषणा विजय लाड यांनी केली.
हिंगोली (Dasbodh Study Foundation) : श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या अस्पर्शित वाङ्मयावर दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या व्यासपीठातर्फे लवकरच दोन अभ्यासक्रम श्री समर्थ रामदास स्वामी साहित्य अध्यासन या नावाने चालू करण्याचे निश्चित झाले आहे अशी माहिती संचालक विजय लाड ह्यांनी हिंगोलीत दिली.ते पुढे म्हणाले की या संदर्भात नुकतीच पुणे येथे दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन द्वारे घेण्यात आलेल्या दोन दिवसीय बैठकीमध्ये विस्तृत चर्चा होऊन श्री रामदास स्वामी यांच्या अभंग, पंचके, हिंदी पदावल्या, भारुड, गोंधळ, लोकसाहित्य रचना यावर पाच वर्षांचा अभ्यासक्रम सौ. विद्याताई लव्हेकर, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली तर वय वर्ष २० ते ३५ या वयोगटातील तरुणांसाठी ऑनलाइन पद्धतीने समर्थ रामदास स्वामींचे वांग्मय मानवी जीवनातील अनेक समस्यांवर कसे मार्गदर्शक आहे हे सांगणारा सहा महिने कालावधीचा उपक्रम कराड येथील श्री. विवेक सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली राबविला जाईल.

दोन्ही उपक्रमांचा अभ्यासक्रम निश्चित करणे, संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देणे. त्याचप्रमाणे पीडीएफ आणि दृकश्राव्य माध्यमातून तरुणांना आकर्षित करणारा एक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम देण्यासाठी वेगवेगळ्या समितींची रचना करण्यात आली आहे. दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन ची एक शाखा म्हणून "श्री रामदास स्वामी साहित्य अध्यासन" देश विदेशात लवकरच कार्यरत होईल असा विश्वास फाउंडेशनचे संचालक डॉ. विजय लाड, मेधा कुलकर्णी, अपर्णा वांगीकर आणि फाउंडेशनच्या कोअर टीम मधील सदस्यांनी व्यक्त केला आहे. देशातल्या अनेक राज्यांमधून समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक या दोन उपक्रमांसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार आहेत . दोन दिवसीय बैठकीचा प्रारंभ श्री रामदास स्वामी आणि चाळीस वर्षांपूर्वी दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे बीजारोपण करणाऱ्या पू.अक्का स्वामी वेलणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला तर समारोप कल्याणकरी प्रार्थनेने झाला.
समर्थ संप्रदायातील क्रांतिकारी दिशा देणाऱ्या या दोन दिवसीय बैठकीच्या यशस्वितेसाठी सौ. वृंदा जोगळेकर, सौ. प्रीती जोशी, ओमकार जोशी, बाळासाहेब पाटील, पुरूषोत्तम वांगीकर, आनंद जोगळेकर, सौ शमिका खळदकर, सौ. माधवी पानसे, अनिल वाकणकर, सौ विनया विद्वांस, सौ. शुभदा थिटे, विनायक विद्वांस , विजयाताई सबनीस, संतोष सप्रे, विवेक थिटे यांनी परिश्रम घेतले.