चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय (दिना प्रकल्प) गुरुवारी (दि. 30 जुलै) सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असून धरणातून 68 सेंटीमीटर उंचीने पाणी ओसंडून वाहत आहे.
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय (दिना प्रकल्प) गुरुवारी (दि. 30 जुलै) सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असून धरणातून 68 सेंटीमीटर उंचीने पाणी ओसंडून वाहत आहे. सकाळी 7 वाजताच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी 231.25 मीटर झाली असून जिवंत पाणीसाठा 67.54 दशलक्ष घनमीटर (100 टक्के) इतका आहे. धरणातून सध्या 131.951 क्युमेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गुरुवारी सकाळी 92 मिमी पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 344 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणातील जिवंत पाणीसाठा 62.87 दशलक्ष घनमीटर (83.08 टक्के) होता. यंदा तुलनेने कमी पाऊस असूनही काल झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाची आकडेवारी
- पूर्ण जलसाठा पातळी (FRL) : 230.57 मीटर
- आजची पाणीपातळी : 231.25 मीटर
- जिवंत पाणीसाठा : 67.54 Mm³ (100%)
- आजचा पाऊस : 92 मिमी
- 1 जूनपासूनचा एकूण पाऊस : 344 मिमी
- ओव्हरफ्लो : 68 सेंटीमीटर
- विसर्ग : 131.951 क्युमेक्स