अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त
एटापल्ली (Crop Damage Risk) : एटापल्ली पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या उडेरा येथील आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावरील ग्रेडर गेल्या आठ दिवसापासून बेपत्ता असल्याने धान विक्रीसाठी आणलेल्या शेतकर्यांच्या वाहनांच्या रांगा धान खरेदी केंद्रसमोर लागल्या आहेत. अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
उडेरा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मार्फत धान खरेदी करण्यात येत आहे. मागील १५ दिवसापासून धान खरेदी सुरू झाली आहे. मात्र फक्त एक आठवडा धान खरेदी करण्यात आली. धान खरेदी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने परिसरातील शेतकर्यांनी लांब अंतरावरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने धान विक्रीसाठी आणले. मात्र ग्रेडर आठ दिवसांपासून खरेदीसाठी न आल्याने शेतकर्यावर ट्रॅक्टरचा किराया बसत आहे. अशातच गेल्या दोन दिवसापासून ढगाळी वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे धान खराब होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे तातडीने धान खरेदी करण्याची मागणी होत आहे.याबाबत संबधित ग्रेडर डांगे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. प्रादेशिक व्यवस्थापक अहेरी यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याशीही संपर्क झाला नाही.