Ajegaon Talathi Suspension: जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आजेगावचे तलाठी पांडुरंग सुभाष फुलसावंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
हिंगोली (Ajegaon Talathi Suspension) : जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयात ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आजेगावचे तलाठी पांडुरंग सुभाष फुलसावंगे यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यामुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ११ ऑगस्ट रोजी याबतचा आदेश काढला असून निलंबन २९ जुलै पासून लागू करण्यात आले आहे.
नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार तक्रारदार दिनेश विष्णू चव्हाण यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या पाच एकर जमिनीच्या फेर व्यवहारासाठी फुलसावंगे यांनी २२ हजार रुपयांची लाच मागितली होती. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या सापळ्यात फुलसावंगे यांचे सहकारी ग्राम महसूल अधिकारी रामेश्वर अर्जुन रोडगे यांनी तक्रारदाराकडून आठ हजार रुपये स्वीकारले तर उर्वरित १४ हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारले. या प्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला.
५ जून २०२६ रोजी फुलसावंगे यांनी आपला मोबाईल रोडगे यांना वापरण्यासाठी दिला होता. तसेच त्यांनी तक्रारदाराशी तीन वेळा मोबाईलवरून संपर्क साधून लाचेच्या मागणीसाठी मदत केली होती असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या तपास दरम्यान आढळून आले.यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम ४ मधील तरतुदींनुसार त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निलंबन काळात फुलसावंगे यांचे मुख्यालय तहसील कार्यालय वसमत येथे निश्चित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना निर्वाह भत्ता देय राहील मात्र त्यासाठी त्यांनी खाजगी नोकरी किंवा व्यवसाय न केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. तसेच कार्यालय प्रमुखांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. या प्रकरणी धारकाविरुद्ध विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे.