Korchi Nagar Panchayat: कोरच्या शहरात स्मशानभूमीची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मृतदेह जाळण्याच्या साधनांचा अभाव असल्याने नागरिकांना कटरा नसल्यामुळे लाकूड रचून विधी
मृत्यूनंतरही नागरिकांची अवहेलना
कोरची (Korchi Nagar Panchayat) : कोरची शहरातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था दिवसेंदिवस उघड होत असून आता तर मृतदेह जाळण्यासाठी लाकूड रचण्याचा ‘कटरा’ सुद्धा उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायत काळात उभारण्यात आलेला लोखंडी कटरा आज पूर्णपणे जीर्ण होऊन तुटून पडला आहे, मात्र 2015 पासून अस्तित्वात असलेल्या नगरपंचायतीने त्याची साधी दुरुस्तीही केली नाही. यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांना अक्षरशः मातीवरच लाकूड रचून विधी पार पाडावा लागत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी आणि असंवेदनशील परिस्थिती आहे.
स्मशानभूमीत आधीच पाणी, वीज, शेड, स्वच्छता यांचा अभाव आहे. त्यात आता कटऱ्यासारखी मूलभूत सुविधा नसणे म्हणजे प्रशासनाने माणुसकीलाच तिलांजली दिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत संवेदनशील क्षणी कुटुंबीयांना अशा अडचणींना सामोरे जावे लागणे म्हणजे दुःखावर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नगरपंचायत (Korchi Nagar Panchayat) विविध विकासकामांचे दावे करत असताना, सर्वात मूलभूत आणि आवश्यक सुविधा असलेल्या स्मशानभूमीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने प्रशासनाची प्राथमिकता काय आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की: तात्काळ नवीन लोखंडी कटरा बसवावा स्मशानभूमीचे संपूर्ण आधुनिकीकरण करावे पाणी, वीज, शेड, स्वच्छता यांची सुविधा द्यावी
अन्यथा, नगरपंचायतीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाईल. मृतदेह जाळण्यासाठी साधा ‘कटरा’ देण्याचीही क्षमता नाही का? नगरपंचायत नेमकी कोणासाठी काम करते? मृत्यूनंतरही नागरिकांचा सन्मान राखला जाणार नाही का?