Korachi Taluka villages: कोरची तालुक्यातील गावांमध्ये दोन तालुक्यांच्या सीमा बाधित करण्यात आल्यामुळे नागरिकांना प्रशासनिक कागदपत्रांची माहिती मिळत नाही.
कोरची (Korachi Taluka villages) : दोन तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या गावांमध्ये आजही मूलभूत सुविधा आणि प्रशासनिक सुसूत्रतेचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामी नाडेकल, प्रतापगड (गांगीन) आणि बेतकाठी या तीन गावांतील नागरिकांना शासकीय कामांसाठी अक्षरशः दोन तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. या अजब व्यवस्थेमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
कोरची पंचायत समिती अंतर्गत येणारी ही गावे ग्रामपंचायत खोब्रामेंढा (ता. कुरखेडा) अंतर्गत समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, गावांची नोंद कोरची तालुक्यात असली तरी तहसील कामकाजासाठी नागरिकांना कुरखेडा येथे जावे लागते. तर पंचायत समितीशी संबंधित कामांसाठी कोरची गाठावे लागते. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या विसंगतीमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
मूलभूत सुविधांची वानवा कायम
गावांमध्ये काही प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात नाली, रस्ते, पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा या समस्या अद्याप कायम आहेत. वारंवार वीज खंडित होणे आणि तासन्तास दुरुस्ती न होणे ही गंभीर बाब ठरत आहे. तसेच स्वच्छता आणि शुद्ध पाण्याचा प्रश्नही तीव्र आहे.
योजनांच्या लाभात अडथळे
शासकीय योजनांचा लाभ घेताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आवश्यक कागदपत्रांसाठी ग्रामपंचायत खोब्रामेंढा, तसेच कोरची व कुरखेडा या दोन्ही तालुक्यांच्या कार्यालयांत वारंवार जावे लागत आहे. त्यामुळे वेळेत कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत आणि अनेकदा पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात.
प्रशासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन एकसंध आणि स्पष्ट प्रशासनिक व्यवस्था निर्माण करावी, तसेच मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.