हिंगोली शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे.
हिंगोली (Civic Issues) : हिंगोली शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. तलाव परिसराला नवे रूप देण्यासाठी प्रशासनाने तलावाच्या चोहीबाजूंनी नागरिकांना फिरण्यासाठी सिमेंटचा रुंद रस्ता तयार केला आहे. सकाळ- संध्याकाळ शेकडो नागरिक येथे फिरायला, व्यायामासाठी येतात. मात्र, सायंकाळनंतर या परिसराचे चित्र पालटते. कोट्यावधी रुपये खर्चातून सुशोभित केलेला हाच परिसर आता मद्यपींसाठी खुला अड्डा बनत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सात वाजल्यानंतर मद्यपींचे टोळके तलावाकाठच्या रस्त्यावर जमा होतात. खुलेआम मद्यपान करून बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, चिप्सची पाकिटे तिथेच टाकून निघून जातात. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना, महिला व लहान मुलांना काचेच्या बाटल्यांच्या तुकड्यांवरून वाट काढावी लागते. फोटोत दिसत असल्याप्रमाणे, नव्याने बांधलेल्या सिमेंट रस्त्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याचे उष्टे कागद आणि कचरा पसरलेला दिसून येतो. यामुळे परिसराची दुर्दशा होत असून सुशोभीकरणाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
जलेश्वर तलाव हा शहरातील एक महत्त्वाचा जलस्रोत आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करून रस्ते, दिवाबत्ती व संरक्षक कठडे बसवण्यात येत आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष व रात्रीच्या वेळी गस्तीचा अभाव यामुळे मद्यपींचे धाडस वाढले आहे. याठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर जर तातडीने कारवाई झाली नाही, तर भविष्यात महिला व कुटुंबीयांना येथे येणे अवघड होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी सांगितले की, अंधार पडल्यानंतर या भागातून जाण्यासही भीती वाटते. मद्यपींच्या टोळ्यांमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तलावाचे सुशोभीकरण हे नागरिकांच्या सोयीसाठी केले जात आहे, मात्र ते मद्यपींसाठी पर्यटन स्थळ बनू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी नियमित गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि मद्यपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत तर कोट्यवधींचा निधी खर्च करून सुरू असलेले हे सुशोभीकरण व्यर्थ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांनी पालिका व पोलीस प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.