Parbhani Theft Case: परभणीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद करून २४ तासात पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाची कारवाई...!
परभणी (Parbhani Theft Case) : गंगाखेड शहरातील सारडा कॉलनी परिसरातील शिक्षकाच्या घरात भरदुपारी घरफोडी करून सोन्याचे दागिणे घेऊन पसार होतांना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेल्या चोरट्याला पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पथकाने २४ तासात जालना येथून ताब्यात घेत गजाआड केले आहे.
शहरातील सारडा कॉलनी परिसरात राहणारे शिक्षक संजीवकुमार व्यंकटराव गबाळे यांचे कुटुंब घराला कुलूप लावून शनिवार ९ मे रोजी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने भरदुपारी त्यांच्या घराचे कुलूप कोंडी तोडून सोन्याचे दागिणे पळविले होते. चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला होता. (Parbhani Theft Case) याप्रकरणी रविवार १० मे रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. गंगाखेड शहरातील गजबजलेल्या वस्तीत भरदुपारी घरफोडी झाल्याच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेला घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणावा, असे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदन परिहार, पोह.महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, पोह लक्ष्मण कांगणे, पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, सिद्धेश्वर चाटे, माणिक डुकरे, सचिन भदरगे, नामदेव दुबे, राम पौळ, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, केशव लटपटे, निलेश परसोडे, दिलीप निलपत्रेवार, शरद सावंत, हुसेन, गायकवाड, साने, हानवते आदींनी याचा तपास घेत ही घरफोडी समर्थ नारायण मुळे रा. गंगाखेड याने केल्याची व तो जालना येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून सायबर सेलचे गणेश कौटकर यांची मदत घेत सोमवार ११ मे रोजी समर्थ मुळे यास जालना येथून ताब्यात घेत घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले १५ ग्राम पेक्षा अधिक वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत अंदाजे १ लाख ७१ हजार ५०० रुपये व रोख १६ हजार रुपये असा एकूण १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस मुद्देमालासह गंगाखेड पोलीस ठाण्यात हजर केले.
या (Parbhani Theft Case) गुन्ह्यात आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केल्या जात आहे. घटनेचा पुढील तपास गंगाखेडचा ग्रेड पोउपनि.युसूफ खान पठाण, पोशि. परसराम परचंवाड करीत आहेत.