Computer Coding Workshop: पहिल्या यशस्वी कोडिंग कार्यशाळेनंतर दिलेले आश्वासन पाळत मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी अहान छापरवाल याने पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक
मानोरा (Computer Coding Workshop) : पहिल्या यशस्वी कोडिंग कार्यशाळेनंतर दिलेले आश्वासन पाळत मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी अहान छापरवाल याने पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठोली (ता. मानोरा) येथे ६ ते ११ जुलैदरम्यान इयत्ता पाचवी व सहावीच्या सुमारे ७० विद्यार्थ्यांसाठी संगणक आत्मविश्वास व मूलभूत कोडिंगची कार्यशाळा उत्साहात पार पडली.
जिल्हयातील साखरा येथील शाळेच्या कोडींग कार्यशाळेच्या अनुभवातून शिकत अहानने कार्यशाळेची रचना बदलली. सुरुवातीला विद्यार्थ्यांना संगणक सुरू-बंद करणे, माऊस हाताळणे आणि ‘पेंट’च्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवणे शिकवले. त्यानंतर फळ्यावर अल्गोरिदम, फ्लोचार्ट, निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि पुनरावृत्ती (लूप) या संकल्पना सोप्या उदाहरणांतून समजावून सांगितल्या.
विद्यार्थी वयाने लहान आणि इंग्रजी वाचनात नवखे असल्याने यावेळी स्क्रॅच ज्युनिअर या चित्राधारित कोडिंग ॲपची निवड करण्यात आली. त्यामुळे अक्षरांपेक्षा चित्रांच्या साहाय्याने मुलांना कोडिंग सहज समजू लागले. शाळेत केवळ तीन संगणक उपलब्ध होते. त्यामुळे नऊ विद्यार्थ्यांचा गट प्रत्यक्ष सराव करत असताना उर्वरित विद्यार्थी प्रोजेक्टरवर प्रत्येक टप्पा पाहत होते. त्यामुळे स्वतःची वेळ येईपर्यंत त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला.
कार्यशाळेच्या (Computer Coding Workshop) शेवटच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणकावर काम करण्याची संधी मिळाली. काही मिनिटांतच त्यांनी स्क्रॅच ज्युनिअरवर बास्केटबॉल कोर्टात चेंडू उडविणारा छोटासा अॅनिमेशन प्रकल्प तयार केला. स्वतः तयार केलेला प्रकल्प स्क्रीनवर चालताना पाहून विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी एका विद्यार्थ्याने उत्साहाने सांगितले, “आता मुलाखतीत संगणकाबद्दल काहीही विचारलं, तरी आम्ही आत्मविश्वासाने उत्तर देऊ.” तर दुसऱ्याने हसत विचारले, “दादांनी शिकवलं आणि आम्हाला खूप खूप मज्जा आली. पुढच्या वर्षी काय शिकवणार?” याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन लोंढे म्हणाले, “अहानने आम्हाला नवी वाट दाखवली आहे. इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांना कोडिंगची ओळख करून देत त्यांच्या मनात आयुष्यभर टिकणारी जिज्ञासा निर्माण केली आहे. या वाटेवर पुढे जाण्याचा आमचा निर्धार आहे. विठोलीतील या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या मनातील संगणकाची भीती दूर करत तंत्रज्ञानाविषयी कुतूहलाची नवी ठिणगी पेटवली आहे. या (Computer Coding Workshop) उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख झाली असून माशा खायला देण्याऐवजी मासे पकडायला शिका या उक्तीचा अर्थ मिळाला आहे.