राज्यात सुरू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाला दिवसेंदिवस अधिक तीव्रता येत असून, चौथ्या दिवशीही संप सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
चिखली (Chikhli Teachers Strike) : राज्यात सुरू असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाला दिवसेंदिवस अधिक तीव्रता येत असून, चौथ्या दिवशीही संप सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा संप विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू आहे. मंत्रालय स्तरावर अलीकडेच चर्चा झाली असली तरी त्यातून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये असंतोष कायम आहे. विशेषतः जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शांततामय मार्गाने पाठपुरावा करूनही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे समन्वय समितीने स्पष्ट केले आहे. “जोपर्यंत मागण्यांवर न्याय्य निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, उद्या (दि. २४ एप्रिल) चौथ्या दिवशीही जिल्ह्यात विविध ठिकाणी संपकरी मोर्चे काढून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही माहिती महसूल कर्मचारी संघटना, तालुका चिखलीचे अध्यक्ष ब्रह्मा देवकर यांनी दिली आहे.