चिखली तहसील कार्यालयात शेतकरी व नागरिकांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तहसीलदार विजय सवडे यांचे आवाहन
चिखली (Chikhli Revenue Camp) : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर तत्काळ मार्गी लागावेत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, पुरवठा, निवडणूक, आधार सेवा आदी विविध विभागांच्या योजना व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरांचे आयोजन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे –
१) दि. ११ मे २०२६ – संत सावता माळी भवन, चिखली (चिखली मंडळ)
२) दि. १४ मे २०२६ – जिल्हा परिषद शाळा, गांगलगाव (कोलारा मंडळ)
३) दि. १५ मे २०२६ – जिल्हा परिषद शाळा, बोरगाव काकडे (एकलारा मंडळ)
या शिबिरामध्ये पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुल योजनांअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना प्रती घरकुल ५ ब्रास मोफत वाळू मंजुरी, पीएम किसान योजनेसाठी लँड सिडिंग, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे ई-केवायसी, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व फेरफार वाटप, अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी तयार करणे, नवीन आधार नोंदणी व अद्ययावत सेवा, विविध दाखले वितरण, मतदान कार्ड व आधार जोडणी, संजय गांधी निराधार योजनेची कार्यवाही, रेशन कार्ड सेवा, जॉबकार्ड, आभा कार्ड, आरोग्य तपासणी व लसीकरण, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, महाडीबीटी अंतर्गत कृषी योजनांचा लाभ आदी सेवा दिल्या जाणार आहेत.
तसेच जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, ग्रामविकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, शेततळे, सिंचन साधने, पॉलीहाऊस, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या योजनांबाबत मार्गदर्शन व लाभही देण्यात येणार आहेत.
याशिवाय शासनाच्या नव्या निर्णयांबाबतही नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. शेतजमीन अकृषिक (NA) करण्यासाठी स्वतंत्र सनद किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष परवानगीची अट रद्द करण्यात आली असून आता केवळ एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरावे लागणार आहे. वार्षिक NA करही रद्द करण्यात आला आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत शेतरस्ते बारमाही करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल व यंत्रसामग्रीची वाहतूक सुलभ होणार आहे. तसेच तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जुन्या खरेदी-विक्री व्यवहारांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नियमित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असल्याची माहितीही या शिबिरात दिली जाणार आहे.
चिखली तालुक्यातील नागरिकांनी या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.