Chikhali Tax Hike Cancelled: नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वी विविध करांमध्ये वाढ लागू केली होती. या करवाढीमुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि असंतोष निर्माण झाला होता.
नगरपरिषद प्रशासनाचा सकारात्मक निर्णय; नागरिकांना मोठा दिलासा
चिखली (Chikhali Tax Hike Cancelled) : नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वी विविध करांमध्ये वाढ लागू केली होती. या करवाढीमुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि असंतोष निर्माण झाला होता. या संदर्भातील तक्रारी पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या चिखलीच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 नुसार नगरपरिषदांनी साधारणतः प्रत्येक चार वर्षांनी करांचे पुनर्मूल्यांकन करून आवश्यकतेनुसार करवाढ करणे अपेक्षित असते. चिखली नगरपरिषदेत यापूर्वी सन 2012 मध्ये करवाढ करण्यात आली होती. त्यावेळी नगरपरिषद काँग्रेसच्या ताब्यात होती आणि तत्कालीन अध्यक्षांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर 2017 पासून चिखली नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष कार्यरत होते. मात्र, या कालावधीत नागरिकांवर कोणतीही करवाढ लादण्यात आली नाही. पुढे नगरपरिषदेचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात गेल्यानंतर प्रशासकीय स्तरावर करवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यानुसार वाढीव कर लागू करण्यात आले.
मात्र, या वाढीव करांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने आमदार श्वेता महाले पाटील यांनी अधिवेशन संपताच या विषयाची तातडीने दखल घेतली. त्यांनी नगराध्यक्ष श्री. पंडितराव देशमुख, नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर आमदार महाले पाटील यांनी प्रशासन आणि नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना वाढीव करवाढ तात्काळ मागे घेण्याचे स्पष्ट व कडक निर्देश दिले.
यावेळी आमदार महाले पाटील म्हणाल्या की, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत नागरिकांवर वाढीव करांचा अतिरिक्त भार टाकणे योग्य ठरणार नाही. नगरपरिषदेने प्रथम शहरातील मूलभूत व दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढणे आवश्यक असले तरी त्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करणे अधिक महत्त्वाचे आहे. नागरिकांना विकासाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाल्यानंतरच महसूलवाढीचे निर्णय घेणे योग्य ठरेल. नागरिकांवर आर्थिक ओझे टाकण्याऐवजी त्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी बैठकीत मांडली.
आमदार श्वेता महाले पाटील यांच्या सूचनांचा आणि कडक निर्देशांचा आदर करत नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, मुख्याधिकारी तसेच नगरपरिषद प्रशासनाने वाढीव करवाढ मागे घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांना वाढीव कर भरावा लागणार नसून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील चिखली नगरपरिषदेने जनभावनांचा आदर करून घेतलेल्या या निर्णयाचे शहरभर स्वागत होत आहे. आमदार श्वेता महाले पाटील यांच्या संवेदनशील, लोकाभिमुख आणि ठाम भूमिकेमुळे तसेच नगराध्यक्ष पंडितराव देशमुख आणि नगरपरिषद प्रशासनाच्या सकारात्मक सहकार्यामुळे नागरिकांच्या हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय शक्य झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.